Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सरन्यायाधीशांवरील लैंगिक शोषणाचा आरोप फेटाळला
ऐक्य समूह
Tuesday, May 07, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी एका माजी महिला कर्मचार्‍याची तक्रार सोमवारी फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी कर्मचारी महिलेने सरन्यायाधीशांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, चौकशी समितीच्या या निर्णयामुळे आपली खूप निराशा झाली आहे. या समितीसमोर सगळ्या गोष्टी ठेवूनही आपल्याला न्याय मिळाला नाही. त्यामुळे आपण खूप भयभीत झालो आहोत, अशी प्रतिक्रिया या महिला कर्मचार्‍याने व्यक्त केली आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपला लैंगिक छळ केल्याची तक्रार सर्वोच्च  न्यायालयातून बडतर्फ करण्यात आलेल्या महिला कर्मचार्‍याने केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्या. शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली न्या. इंदू मल्होत्रा व न्या. इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या चौकशीत सरन्यायाधीशांवरील आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळले नाही, असे या त्रिसदस्यीय समितीने म्हटले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या सेक्रेटरी जनरलनी आज एक पत्रक जारी करून याबाबत माहिती दिली. अंतर्गत चौकशी समितीने 5 मे रोजी आपला अहवाल सादर केला. अंतर्गत प्रक्रियेनुसार सरन्यायाधीशांनंतर ज्येष्ठता असलेल्या न्यायाधीशांकडे हा अहवाल सोपवण्यात आला आहे, त्याची एक प्रत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पाठवण्यात आली आहे, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी कर्मचारी महिलेने 19 एप्रिल 2019 रोजी तक्रार केली होती. समितीने केलेल्या चौकशीत या तक्रारीत कोणतेही ठोस तथ्य आढळून आले नाही, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी ‘इन-हाउस’ चौकशी झाली असल्याने 2003 मधील इंदिरा जयसिंह खटल्याप्रमाणे या तक्रारीवरील चौकशी अहवालही सार्वजनिक केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, सरन्यायाधीशांविरोधात केल्या गेलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमागे मोठे कारस्थान असल्याचा आरोप एका वकिलाने केला आहे. त्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांची एकसदस्यीय समिती नेमली आहे. मात्र, लैंगिक छळासंबंधी तक्रारीची चौकशी करणार्‍या समितीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आपण हे प्रकरण हातात घेणार नाही, असे न्या. पटनायक यांनी या आधीच स्पष्ट केले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: