Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांकडे तपास
ऐक्य समूह
Friday, April 26, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 25 (वृत्तसंस्था) : लैंगिक छळाच्या आरोपांच्या आड लपून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात व्यापक कारस्थान रचण्यात आल्याचा दावा एका वकिलाने केल्यानंतर या कथित षडयंत्राचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांची एकसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठे ‘फिक्स’ केली जातात, या दाव्याचाही तपास ही समिती करणार आहे. या प्रकरणी सीबीआय व इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक आणि दिल्ली पोलीस आयुक्तांनी या समितीला तपासात सहकार्य करावे, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, गोगोईंवरील कथित लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी ही समिती तपास करणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. खंडपीठे ‘फिक्स’ करणारे लोक आणि न्यायालयीन कामकाजावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या कॉर्पोरेट क्षेत्रातील एका बड्या असामीकडून सरन्यायाधीशांविरोधात कारस्थान रचले गेल्याचा दावा करणारे वकील उत्सवसिंग बैन्स यांना या कटासंबंधीची सर्व कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तत्पूर्वी, न्या. अरुण मिश्रा, न्या. आर. एफ. नरिमन आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या विशेष खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली असता, न्यायपालिकेवर पद्धतशीर हल्ला करण्याच्या प्रयत्नांबद्दल कठोर टिप्पणी केली. काही लोकांना हा देश आणि न्यायपालिका पैशाच्या बळावर चालवायची आहे. मात्र, हे न्यायालय राजकीय ताकद आणि पैशाच्या बळावर चालवता येणार नाही. त्यामुळे न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप करू नका. आगीशी खेळू नका. आगीशी खेळाल तर तुमची बोटे भाजतील, असा इशाराही न्या. अरुण मिश्रा यांनी दिला. आता श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांना हे सांगायची वेळ आली आहे की, सर्वोच्च न्यायालयावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांपासून दूर रहा. तुम्ही असे प्रयत्न करू नका. आगीशी खेळाल तर तुमचीच बोटे भाजतील. जेव्हा बड्या लोकांच्या संदर्भातील एखादा खटला येतो, त्यावर सुनावणी सुरू होते, तेव्हा आम्हाला पत्रे पाठवली जातात. आम्ही न्यायपालिका चालवू शकतो, असे या ताकदवान लोकांना वाटते, असेही न्या. मिश्रा म्हणाले.
श्रीमंत आणि उच्च वर्तुळातील लोक देश आणि न्यायालयाला पैशांची ताकद वापरत चालवू इच्छित आहे का? कोणतेही मोठे प्रकरण असले तर तीन ते पाच टक्के वकील त्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात.     
त्यामुळे वकिलांच्या संघटनेची आणि न्यायव्यवस्थेची बदनामी होते. गेल्या तीन ते चार वर्षांत न्यायव्यवस्थेवर पद्धतशीरपणे हल्ला केला जात असून त्याविरोधात कारवाई करण्याची वेळ आली आहे. ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर गेल्या तीन ते चार वर्षांपासून हल्ला केला जात आहे, ते पाहता ही संस्था नष्ट होईल, अशी भीती खंडपीठाने व्यक्त केली.
न्या. रमण्णांची माघार
दरम्यान, सरन्यायाधीशांविरोधात करण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, त्यातून न्या. एन. व्ही. रमण्णा यांनी माघार घेतली आहे. न्या. एस. ए. बोबडे यांच्या नेतृत्वाखालील या समितीत न्या. इंदिरा बॅनर्जी यांचाही समावेश आहे. न्या. गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणार्‍या सर्वोच्च न्यायालयातील माजी महिला कर्मचार्‍याने न्या. रमण्णा यांच्याबाबत आक्षेप घेतला. ही महिला या समितीसमोर शुक्रवारी हजर राहणे अपेक्षित आहे. मात्र, तिने एक पत्र लिहून आपला आक्षेप नोंदवला. त्याचबरोबर एका महिलेने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करणार्‍या समितीत एकच महिला न्यायाधीश का, असा सवालही तिने या पत्रात केला. माझी नियुक्ती न्या. गोगोई यांच्या घरी असलेल्या कार्यालयात झाली होती. न्या. रमण्णा हे न्या. गोगोई यांचे चांगले मित्र असल्याचे मला माहीत आहे. त्यामुळे ते चौकशी समितीत असतील तर निष्पक्षपाती कामकाज होणार नाही, अशी शंका तिने उपस्थित केली. त्यामुळे न्या. रमण्णा यांनी या समितीतून अंग काढून घेतले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: