Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काश्मीरमध्ये 69 दहशतवाद्यांचा खात्मा
ऐक्य समूह
Thursday, April 25, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: na1
5श्रीनगर, दि. 24 (वृत्तसंस्था) : सुरक्षा दलांनी दहशतवादी संघटनांविरोधात उघडलेल्या मोहिमेत यावर्षी आतापर्यंत 69 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून 12 दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुधवारी मोहम्मद वकार या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरूच असून पुलवामा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर ही मोहीम अधिकच तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले असून या संघटनांमध्ये स्थानिक काश्मिरी तरुणांचे भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असे भारतीय लष्कराच्या 15 कॉर्प्ससचे कमांडिंग ऑफिसर के. जी. एस. धिल्लन यांनी बुधवारी सांगितले. धिल्लन यांनी जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबागसिंग, काश्मीर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक एस. पी. पणि, सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक झुल्फिकार हसन व बारामुल्लाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अब्दुल कय्युम यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जम्मू-काश्मीरमधील सद्य स्थितीची माहिती दिली. दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुणांचे भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हे चांगले लक्षण आहे, असे दिलबागसिंग यांनी सांगितले. 2018 मध्ये एकूण 272 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
या वर्षात आतापर्यंत 69 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून 12 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे. या हल्ल्यानंतर 41 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यातले 25 दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’चे होते. त्यातील 13 दहशतवादी पाकिस्तानी होते, अशी माहिती धिल्लन यांनी दिली. दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई अशीच पूर्ण जोमाने सुरू राहील. आम्ही दहशतवाद वाढू देणार नाही. काश्मीरमध्ये आम्ही ‘जैश’च्या नेतृत्वाला लक्ष्य केल्याने परिस्थिती   बदलली आहे. भारतीय लष्कराच्या दरार्‍यामुळे आता काश्मीर खोर्‍यात ‘जैश’चे नेतृत्व करण्यासाठी कोणीही पुढे येण्यास तयार नाही, असे धिल्लन म्हणाले.
दरम्यान, मोहम्मद वकार या पाकिस्तानी दहशतवाद्याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती बारामुल्लाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अब्दुल कय्युम यांनी पत्रकार परिषदेत दिली. वकार हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियाँ मोहल्ला, मिनावली येथील रहिवासी असून तो ‘लष्कर-ए-तोयबा’साठी काम करत होता. तो 2017 मध्ये भारतात घुसखोरी करून एक वर्ष श्रीनगरमध्ये रहात होता. तेथून तो दहशतवादी कारवाया करत होता.
वकारचे ब्रेनवॉशिंग करण्यात आले होते. भारत सरकार काश्मीरमध्ये मुस्लिमांना नमाज पढू दिले जात नाही. तेथे मुस्लिमांचे शिरकाण केले जाते, असे त्याच्या डोक्यात भरवले गेले होते. त्यामुळेच तो ‘तोयबा’मध्ये भरती होऊन काश्मीर खोर्‍यात आला होता. पाकिस्तानी दहशतवादी संघटना तेथील युवकांना जिहादकडे कशा पद्धतीने वळवत आहेत, ते वकारच्या अटकेमुळे समोर आले आहे, असे कय्युम यांनी सािं
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: