Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार
ऐक्य समूह
Saturday, January 12, 2019 AT 11:27 AM (IST)
Tags: mn1
वैशाली येडे यांच्या भाषणाने साहित्यरसिक अंतर्मुख
5यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी), दि. 11 (वृत्तसंस्था) :  शेतकर्‍यांच्या अडचणीच्या वेळी दिल्लीतली नव्हे तर गल्लीतलीच बाई कामी येते हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. मराठीच्या मंगल सोहळ्याला कुंकवाचा टिळा लावण्यासाठी माझ्यासारखी विधवाच कामी आली, हे माझे भाग्य समजते. आम्ही विधवा नाही, महिला आहोत. माझा नवरा कमकुवत होता. तो गेला मी लढणार आहे. सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही. माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार आहे, अशी वेदना मांडत 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी व्यवस्थेवर आसूड ओढले.
यवतमाळच्या समता मैदानावर 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन रिमोटद्वारे बटण दाबून दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. इंग्रजी साहित्यातील सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांना दिलेल्या निमंत्रणावरून वाद  झाल्याने सहगल यांनी माघार घेतली. त्यामुळे कळंब तालुक्यातील राजूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याची पत्नी वैशाली येडे यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आले.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर वैशाली येडे यांनी केलेल्या भाषणाने साहित्यसिकांना अंतर्मुख व्हायला लावले. नमस्कार मंडळी, अशी सुरुवात करत त्यांनी व्यवस्थेला कठोर शब्दांत फटकारले. त्या म्हणाल्या, अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही तर गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झाले. मराठीच्या इतक्या मोठ्या मंगल सोहळ्याला कुंकवाचा टिळा लावण्यासाठी माह्यासारखी विधवाच कामी आली, हे माहं भाग्य समजते. पुनर्जन्म मी मानत नाही, मानला असता तर माह्या नवर्‍यावानी मी पन आत्महत्या केली असती. त्यानं आत्महत्या केली. पुढचा जलम उद्योगपतीचा घेईन. अंबानी अन् अदानीच्या घरी जलमीन अन् शेतकर्‍याचा माल जास्त भाव देऊन विकत घेईन म्हनून तो मेला. शेतकरी मरून मातीत गेला तरी बी तो अंबानी, अदानी होत नाही, हे माह्या नवर्‍याले समजलं नाही. माहा याच जलमावर विश्‍वास हाय. म्हून मी याच जन्मी लढीन अन् वायद्याची शेती फायद्यात आनीन म्हनून लढत हावो.. लडत (रडत) नाही, लढत हाव.
 मी बारावी शिकली हाय; पन बहिनाबाईची लेक हाय. म्हनून ज्योतिषाले हात नाही दाखवत. जो कोनी अंगावर हात टाकाले आला त्याले हात दाखवते. हे शिकली मी आमच्या एकल महिला संघटनेत. हरिभाऊच्या अ‍ॅग्रो थिएटरमध्ये. लेखन, त्याचा बाजार, साहित्य वाचलेलं नाही; पन मानसं वाचले हायत. मानसं पुस्तकं वाचून नाही समजत, त्याच्यासाठी मानसायतच जावं लागते तरीही साहित्यानं जगन्याचं बळ येते, हे खरं हाय. म्हनूनच ‘तेरवं’ या नाटकानं हे बळ दिलं. वांझोटे शब्द नाही, काम करतेत आमचे हरिष इथापे अन् श्याम पेठकर. म्हनून त्यायच्या शब्दात ताकत हाय. श्यामभाऊनं हे नाटक लिहिलं. हरिभाऊनं दिग्दर्शन केलं. नाटकात काम करन्याचं प्रशिक्षन दिलं आम्हाला. त्यातून उभं राहन्याचं बळ आलं.
मर्द शेतकर्‍याच्या आत्महत्यानं हादरले सारे. त्याच्या करुण कहान्यानं हेलावले. मात्र, आम्हा बायकायच्या जगन्याचा मर्दानी संघर्ष नाही दिसला. बाई सोयीले असते. बोलनारी बाई नाही चालत, डोलनारी अन् डोलवनारी पाह्यजे असते.
म्हनून दिल्लीवाली विधवा नाही चालली. मले बलावलं, पन बोलनार त मी पन हायच ना. एक सांगून ठेवतो, मी विधवा नाही. आम्ही विधवा नाही. एकल महिला आहोत. श्यामभाऊनं नाटकात वाक्य लिहिलं हाय, ‘समाजच विधवा झाला हाय...’ अन् तेच खरं हाय. एकटी बाई सार्‍यायले संधीच वाटते. आजकालचे लक्षूमन एकली पाहून वयनीले लक्ष्मनरेषा काढते; पन ते तिले कोनी वाचवाले येऊ नये त्याच्यापासून याच्यासाटी. तिनं बाह्यरं जाचं नाही अन् बाहेरच्यानं अंदर याचं नाही अन् हा करन तिचा घास.
बाई सगळं सोडून येते कायले नवर्‍याच्या मांग त्याच्या घरांत. सारंच बदलते ना तिचं. कुळाचं नाव, कुळाचं दैवत, मायबाप, गाव, घर अन् बापाच्या ठिकानी नवर्‍याचं नाव येते... नवरा त तिचं तिच्या मायबापानं ठिवलेलं नावबी बदलून टाकते. तिचं आपलं काहीच राहात नाही. अर्धी जिंदगी झाल्यावर अचानक सारं असं बदलून जाते. एखांद्या मर्दाचं असं नाव बदलून टाकलं अन् सारंच बदलून टाकलं अन् म्हनलं त्याले का आता जगून दाखव त जमनं का त्याले हे, असा बिनतोड सवाल वैशाली येडे यांनी केला.
मी वैशाली ---- होती. अठारा वर्षाची होतपर्यंत. मी वैशाली सुधाकर येडे झाली. सुधाकर येडेचा समजा सुधाकर वैशाली ---- झाला असता त? थोडा धक्का नाही सह्यन झाला अन् खुदखुसी करून घेतली त्यानं. एकदा नवरा गेला का सार्‍या गावाले थे बाई संधी वाटते, धन वाटते. जुन्या कायापासून गोधन अन् स्त्री पन धनच वाटत आली हाय. आमच्या वाट्याले आलेलं हे पांढरं कपाय असं निसर्गाच्या नियमानं आलेलं नाही. सटवाईनं नाही लेहलं, हे विधवापन आमच्या कपायावर. जगरहाटीनं लादलं हाय हे. व्यवस्थेनं आपल्या नवर्‍यायचा बळी घेतला हाय. तो त मेलाच पन आमच्या जित्तं असन्याचाही कोनी विचारही नाही करत. म्हणून मंग,
आम्ही तेरवं मांडलं
बाई आम्ही तेरवं मांडलं
आसवायचं दानं आम्ही
खलबत्यानं कांडलं
महादेवानं केली शेती
पार्वतीच त्याची सोबती
जमिनीच्या वाह्यतीत बाई
हलाहलच सांडलं
गडी आमचा महादेव
झाला रंक बाई रावाचा
मामला घामाच्या भावाचा
शिवार पायानं लवंडलं
अशी कविता त्यांनी सादर केली. मला बोलावलं, बोलू पन दिलं, आयकूनही घेतलं. ते मनावर घ्या. तुम्ही आमच्या दु:खावर कादंबर्‍या, कथा लिहिता. पुरस्कार भेटते त्याला. सिनेमे काढता. लेखक अन् आम्ही कास्तकार सारखेच, दोघायलेबी भाव नाही भेटत. या संमेलनात अशी चर्चा व्हावं की अभावात जगनार्‍यायले भाव भेटावं. नमस्कार, रामराम, जयभीम, सलाम, हॅव अ गुड डे, असे म्हणत त्यांनी वैशाली येडे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: