Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अयोध्या प्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणीवर
ऐक्य समूह
Friday, January 11, 2019 AT 11:20 AM (IST)
Tags: na2
घटनापीठातून न्या. उदय लळित यांची माघार
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जागेच्या वाद प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. न्या. उदय लळित यांनी पाच सदस्यीय घटनापीठातून माघार घेण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. त्यामुळे आता नव्याने घटनापीठ गठीत करावे लागणार आहे. आता 29 जानेवारीला नव्या घटनापीठासमोर सुनावणीची तारीख निश्‍चित केली जाणार आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास सुनावणी सुरू झाली असताना मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी न्या. उदय लळित यांच्या संदर्भातील एक बाब घटनापीठाच्या निदर्शनास आणून दिली. न्या. लळित यांनी 1994 मध्ये राम मंदिर आंदोलनाशी संबंधित न्यायालयाच्या अवमान प्रकरणात उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंग यांची बाजू अलाहाबाद न्यायालयात मांडली होती, असे अ‍ॅड. धवन यांनी सांगितले. मात्र, या घटनापीठापासून न्या. लळित यांनी स्वत:ला अलग करावे, असे आपले म्हणणे नसल्याचेही त्यांनी सांगितले. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने अ‍ॅड. धवन यांचे म्हणणे नोंदवून घेतले. या घटनापीठात न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. व्ही. रमण व न्या. धनंजय वाय. चंद्रचूड यांचा समावेश होता. अ‍ॅड. धवन यांनी मागणी  केली नसली तरी आपण या घटनापीठातून माघार घेत असल्याचे न्या. लळित यांनी सरन्यायाधीशांना सांगितले. दरम्यान, न्या. लळित यांच्या घटनापीठातील उपस्थितीवर हरकत नसल्याचे रामलल्लाच्यावतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांनी म्हटले. ज्या प्रकरणात न्या. लळित हे कल्याणसिंग यांचे वकील म्हणून उभे राहिले होते, ते प्रकरण पूर्णपणे वेगळे असल्याचे साळवे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर न्या. लळित यांनी घटनापीठातून बाजूला व्हावे यासाठी आपण हा मुद्दा उपस्थित केला नसून न्यायालयाला केवळ माहिती दिल्याचे स्पष्टीकरण अ‍ॅड. धवन यांनी दिले. मात्र, न्या. लळित यांनी घटनापीठापासून अलग होण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता त्यांनी या प्रकरणावरील सुनावणीत भाग घेणे उचित होणार नाही, असे घटनापीठातील अन्य न्यायाधीशांचे मत असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अयोध्या प्रकरणावरील पुढील सुनावणीसाठी नव्याने घटनापीठ गठीत केले जाणार आहे. नव्या घटनापीठात न्या. लळित यांच्या जागी नव्या न्यायाधीशांचा समावेश केला जाणार असल्याने या प्रकरणाची सुनावणी 29 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: