Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एजन्सी देण्याच्या आमिषाने सातार्‍यातील युवकाची सव्वा लाख रुपयांची फसवणूक
ऐक्य समूह
Friday, January 11, 2019 AT 11:27 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 10 : आईस्क्रीम पार्लरची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून सातारा येथील एका युवकाची 1 लाख 23 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वीरभद्र शेळके (वय 32), रा. यादोगोपाळ पेठ, सातारा यांचे चहाचे छोटे हॉटेल आहे. चहाबरोबर आईस्क्रीम पार्लर चालविण्याचा त्यांचा मानस होता. त्यादृष्टीने त्यांनी वेबसाईटवर माहिती घेण्याचा प्रयत्न केला. एका वेबसाईटवर अर्जही भरला. तदनंतर संदीप पटेल नावाने त्यांना फोन आला. तुमचा अर्ज स्वीकारला असून व्हॉटसअ‍ॅपवर पाठवलेली कागदपत्रे भरुन पाठवा तसेच पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्हाला पाठवलेल्या बँक अकौंटवर 25 हजार रुपये पाठविण्याची सूचना करण्यात आली. वीरभद्र शेळके यांनी आधी 25 हजार रुपये, नंतर 19 हजार रुपये असे 44 हजार रुपये पाठवले. काही दिवसांनी आईस्क्रीम पार्लरच्या कन्फर्मेशन लेटरसाठी 80 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. शेळके यांनी 80 हजार रुपये संबंधित अकौंटवर भरले.  
नंतर मात्र संबंधितांचा कोणताही संपर्क न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वीरभद्र शेळके यांनी आज संध्याकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: