Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोटेश्‍वर पुलाच्या कामामुळे नागरिक त्रस्त
ऐक्य समूह
Thursday, January 10, 2019 AT 11:40 AM (IST)
Tags: lo1
चार महिन्यांपासून प्रदक्षिणा घालण्याची वेळ
5सातारा, दि. 9 : सातारा शहर आणि शाहूपुरीला जोडणार्‍या कोटेश्‍वर पुलाचे काम अत्यंत रटाळपणे सुरू असल्याने नागरिकांना व वाहनचालकांना प्रदक्षिणा घालण्याची दुर्दैवी वेळ येवून ठेपली आहे. धिम्या गतीमुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या व्यापार्‍यांवर परिणाम होत असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सातारा आणि शाहूपुरीला जोडणार्‍या कोटेश्‍वर पुलाची दुरवस्था झाल्याने सातारा पालिकेने नवीन पुलासाठी 1 कोटी 21 लाख 57 हजार रुपयांची तरतूद करून 11 सप्टेंबर 2018 रोजी नवीन पुलाच्या कामास प्रारंभ केला. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. शाहूपुरीकडे जाण्यासाठी अनंत इंग्लिश स्कूल मार्ग, दैनिक ऐक्य कॉर्नरपासून ओढ्यातून पुढे, गजानन मंदिर पाठीमागून अशा तीन पर्यायी मार्गांचा अवलंब करत प्रदक्षिणा घालण्याची वेळ नागरिकांसह वाहनचालकांवर येत आहे.
वास्तविक काम सुरू करण्यापूर्वी पाण्याच्या लाइन शिफ्ट करणे आवश्यक होते. मात्र, रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर काम बंद ठेवून पाण्याच्या लाइन शिफ्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले. रटाळ कामामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत नगरपालिकेच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता पुलाचे काम करताना पाइपलाइन फुटल्याने कामाला उशीर होत आहे, पूल आणि त्यावरील रस्त्याचे काम 26 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. बांधकाम सभापती मनोज शेंडे म्हणाले, यापूर्वी 20 फुटांचा पूल होता.              
त्यामुळे एकाच वेळी दोन वाहने जाण्यास अडचणी निर्माण होत होत्या. नवीन पूल हा 40 फुटांचा करण्यात आला असून त्यावर दुतर्फा 5 फुटांचे दोन फूटपाथ बांधण्यात येणार आहेत. पुलाची उंची 1 मीटरने वाढवण्यात आली आहे.
भाऊसाहेबांची पाटीलकी
कोटेश्‍वर पुलाच्या कामाबाबत माहिती घेण्यासाठी नगर अभियंता भाऊसाहेब पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता तुम्ही पालिकेच्या सीओंशी संपर्क साधा, त्यांच्या अपरोक्ष मला माहिती देता येणार नाही, असे सांगत फुकटची पाटीलकी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तद्नंतर बांधकाम सभापती मनोज शेंडे यांची पालिकेत जाऊन भेट घेतली असता त्यांनी सविस्तर माहिती दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: