Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘मिशेलमामा’शी असलेले संबंध उघड करा : मोदी
ऐक्य समूह
Thursday, January 10, 2019 AT 11:37 AM (IST)
Tags: mn2
कितीही धमकावले तरी चौकीदार सफाई करणारच
सूर्यकांत आसबे
5सोलापूर, दि. 9 : जनतेच्या विकासाऐवजी केवळ राजनीतीत गुरफटलेल्या कमिशनखोर आणि दलालखोर विरोधकांना देशाची चिंता नाही. चौकीदाराला कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी साफसफाई करणारच, असे ठासून सांगत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला खुले आव्हान दिले. कमिशनखोरांच्या विरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. ‘ये मोदी दुसरी मिट्टी का बना है, देश के लिए पाई पाई का हिसाब लेगा’ असे सांगत मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. देशाचे वाटोळे करणार्‍यांना सोडणार नाही, असा इशारा देतानाच, संरक्षण क्षेत्रातील दलाल ‘मिशेलमामा’शी असलेल्या संबंधांबाबत विरोधी पक्षाने स्पष्टीकरण द्यावे, असे प्रतिपादन मोदी यांनी केले. ‘बडे बडे दिग्गजोंके साथ मोदी लढ रहा है’, असे सांगत जनतेचा आशीर्वाद हीच चौकीदाराची ताकद असल्याचे सांगत मोदी यांनी सोलापूरकरवासीयांची मने जिंकली.
सोलापूर-तुळजापूर रस्त्याचे चौपदरीकरण, सोलापूर शहरातील भुयारी गटार योजना व मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र, अमृत योजनेंतर्गत हद्दवाढ भागात मलनिस्सारण व्यवस्था सुधारणा, ‘स्मार्ट सिटी’ भागातील पाणी व मलनिस्सारण सुधारणा, उजनी-सोलापूर दुहेरी पाइपलाइन, पंप्रधान आवास योजनेंतर्गत 30 हजार घरांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा बुधवारी  सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवरील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटात झाला. यावेळी झालेल्या विराट जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षांत भाजप सरकारने केलेल्या कामाच्या प्रगतीचा आलेख मांडताना विकासकामांना आडकाठी करणार्‍या काँग्रेसवर टीकेची झोड उठविली.
व्यासपीठावर राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सोलापूर जिल्हा पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खा. शरद बनसोडे, माजी आमदार आणि कामगार नेते नरसय्या आडम मास्तर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना पुणेरी पगडी, घोंगडे, भगवद्गीता आणि तलवार देण्यात आली.
गेल्या साडे चार वर्षात केंद्र सरकारकडून राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेत पंतप्रधानांनी या सभेत आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला. मोदींच्या संपूर्ण भाषणाचा रोख तुलनात्मक आकडेवारी सादर करण्यावर राहिला. काँग्रेसचा कधी प्रत्यक्ष, तर कधी अप्रत्यक्षरीत्या उल्लेख करत मोदींनी शरसंधान केले. चौकीदाराला कितीही घाबवरण्याचा प्रयत्न केला तरी तो घाबरणार नाही. त्याला माहिती मिळालीच पाहिजे, साफसफाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. ‘आई तुळजाभवानी, पंढरपूर येथील पांडुरंग-रुक्मिणी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, मंगळवेढ्याचे दामाजीपंत यांच्यासमोर नतमस्तक होऊन आणि हुतात्म्यांना अभिवादन करत आपल्याला सोलापूरकरांनी आजवर दिलेले प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवावेत’, असे नमूद केले. टाळ्यांच्या कडकडाटात सोलापूरकरांनी पंतप्रधानांच्या मराठी भाषणाच्या सुरवातीचे स्वागत केले. मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची भरभरून प्रशंसा केली. मोदी यांनी भाषणाचा शेवटही मराठीतून करत उपस्थितांची मने जिंकली. मोदींनी जनतेला संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या.
अटल पेन्शन योजना, ‘उडान  योजना, पंतप्रधान आवास योजना, विद्युतीकरण, महामार्ग निर्मिती आदी मुद्द्यांवरून काँग्रेसला मोदी यांनी घेरले. गेल्या साडेचार वर्षात भाजप सरकारकडून जितकी विकासकामे करण्यात आली तेवढी काँग्रेसला दहा वर्षांत करता आली नाहीत, असा आरोप त्यांनी केला. गरीब, शहरी मध्यमवर्ग यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या गृह योजनांची माहितीही दिली.
मोदी म्हणाले, ‘सबका साथ, सबका विकास’ हाच आमच्या सरकारचा नारा आहे. हेच आमचे संस्कार आणि संस्कृती आहे. दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. लोकसभेत आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर झाले आहे. आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा निर्णय झाला. लोकसभेत अजून एक विधेयक काल संमत झाले. त्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान मधून भारतात आलेल्या बाधंवाना भारतीय नागरिकत्व मिळून त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत.
मोदींनी राम मंदिराच्या मुद्द्यावर मात्र भाष्य केले नाही. राफेल करारावरून मोदींवर काँग्रेसकडून चौफेर हल्ला होत आहे. या आरोपांना मोदींनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर दलाल ख्रिस्तियन मिशेलवरून त्यांनी काँग्रेसवर थेट हल्लाबोल केला. ‘मिशेलमामा’शी काय संबंध आहेत, हे काँग्रेसने स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली. मिशेल हा राफेलच्या विरोधात लॉबिंग करत होता. देशाच्या सुरक्षेशी खेळ काँग्रेसने केला, असा  आरोप करतानाच काही लोकांना मिळणारी ‘मलई’ बंद झाल्याने ते टीका करत असल्याचा टोलाही लगावला. आपले सरकार करत असलेल्या कामाची जगभरात दखल घेतली जात असताना काही लोकांना ते रुचत नाही, अशी खोचक टीका त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली. यावेळी लोकांनी दिलेल्या ‘मोदी मोदी’ अशा घोषणांनी मैदान दणाणून गेले होते. त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रिमोट कंट्रोलवर चालणारे सरकार होते, अशी टीकाही त्यांनी केली. आमच्या ‘स्मार्ट सिटी योजनेवरून मजाक केली जात आहे. आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, पण त्यावरून अपप्रचार केला जात आहे. कुणाचेही आरक्षण काढून न घेता नव्याने आरक्षण दिले आहे. आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याच्या विधेयकामुळे खोटे पसरवण्याची कोणाचीही ताकद नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: