Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सर्वांसाठी शिक्षणातून शोध व संशोधन करणे महत्त्वाचे ः खा. श्री. छ. उदयनराजे
ऐक्य समूह
Wednesday, January 09, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 8 : आज प्रत्येकाला स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. आपल्या विशाल भारतात अनेकजण शिक्षणापासून आजही वंचित आहेत. शिक्षण घेताना तुम्ही खूप नशिबवान आहात. कारण या शिक्षणातून शोध व संशोधन होणे महत्त्वाचे आहे तरच आइनस्टाइन, न्यूटन यासारखे चेहरे आपल्या देशातूनही निर्माण होतील, असे उदगार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी काढले.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्यविज्ञान शिक्षण संस्था नागपूर, सातारा जिल्हा शिक्षण विभाग व येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. सी. व्ही. रमण शास्त्रनगरीत आयोजित केलेल्या 44 व्या जिल्हास्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात खा. उदयनराजे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते.
या उदघाटन सोहळ्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, प्रसिध्द जलतज्ञ डॉ. अविनाश पोळ, शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या संस्थापकाच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन अनोख्या पध्दतीने तुळशीच्या झाडाला पाणी घालून तर व्यासपीठावर असलेल्या अलकारीने लिहिलेल्या अक्षरांना आम्लारी स्पे्रने उजळवत आणि आकाशात फुगे सोडून करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी करताना दरवर्षी जिल्हास्तरावर हे वैज्ञानिक प्रदर्शन घेण्यामागे नव्या पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा. शालेय स्तरावर बालवैज्ञानिकांचा शोध घ्यावा या माध्यमातून आयोजित करण्यात येते. आज या प्रदर्शनात 11 तालुक्यातून प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर आणि शिक्षक व परिचर यांची एकूण 121 उपकरणे 16 वर्गात मांडण्यात आली आहेत. यातून नव्या पिढीने साकारलेल्या संकल्पना व शोधांची सर्व जिल्हावासीयांनी प्रदर्शनास भेट देवून अवश्य पाहणी करावी. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी व परिचय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन अण्णासाहेब मगदूम यांनी केले. कार्यक्रमास महिला व बालविकास समिती सभापती सौ. वनिता गोरे, जि. प. सदस्या सौ. भाग्यश्री मोहिते, शालाप्रमुख सौ. स्नेहल कुलकर्णी, उपशालाप्रमुख डी. एस. कांबळे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील विविध शाळांचे शिक्षक, शिक्षिका व मान्यवर उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: