Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
टोळेवाडीच्या माजी सरपंचावर एकाचा प्राणघातक हल्ला
ऐक्य समूह
Tuesday, January 08, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: re1
संशयित स्वत:हून पोलिसांसमोर हजर
5पाटण, दि. 7 : टोळेवाडी, ता. पाटण या गावचे माजी सरपंच नारायण गणपत डिगे (वय 61) यांच्यावर त्याच गावातील भीमराव सीताराम देवकांत (वय 55) याने पाटण येथील लायब्ररी चौकात सोमवारी सायंकाळी 6 वाजता कोयत्याने प्राणघातक हल्ला केेला. देवकांत याने मद्यधुंद अवस्थेत डिगे यांच्यावर तीन वार केले आणि तो स्वत: पाटण पोलीस ठाण्यात हजर झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डिगे यांच्यावर पाटण ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची फिर्याद विशाल जगन्नाथ निकम (वय 28, रा. पिंपळोशी) यांनी पाटण पोलीस ठाण्यात दिली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी एस. आर. कचरे यांनी दिली.
याबाबत माहिती अशी, टोळेवाडीचे माजी सरपंच नारायण डिगे हे सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास पाटण येेथील लायब्ररी चौकात कोणाशी तरी बोलत उभे होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भीमराव देवकांत याने डिगे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्याने डिगे यांच्या डोक्यावर दोन आणि मानेवर एक वार केला. त्यामुळे डिगे हे रक्तबंबाळ अवस्थेत जागीच कोसळले. तेथे उपस्थित असलेल्या विशाल निकम व अन्य काहींनी डिगे यांना पाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन डिगे यांना कराडच्या कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबतची माहिती समजल्यानंतर पाटण ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाली होती. दरम्यान, हल्ल्यानंतर संशयित भीमराव देवकांत हा मद्यधुंद अवस्थेत कोयता घेऊन स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला. एस. आर. कचरे, के. एस. जाधव, एम. एस. मोरे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: