Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स्किन रथाचे सातार्‍यात आगमन
ऐक्य समूह
Tuesday, January 08, 2019 AT 11:25 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 7 : इंडियन असोसिएशन ऑफ डरमॅटॉलॉजिस्ट, व्हेनेरियोलॉजिस्ट अ‍ॅण्ड लेप्रोलॉजिस्ट या अखिल भारतीय संघटनेने अभिनव उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या स्किन रथाचे नुकतेच सातार्‍यात आगमन झाले.
या रथाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्याच्या एका बाजूला एक एलईडी पॅनेल लावले आहे. त्यावर व्हिडिओ सुरू असतात. या व्हिडिओमध्ये विविध प्रकारच्या त्वचा रोगासंदर्भात माहिती दिली जाते. (उदा. कुष्ठरोग, कोड, गजकर्ण, खरुज, सोरियासिस, सिबोरिक डर्म्याटायटिस, अ‍ॅलर्जी वगैरे) हे रोग होण्याची कारणे, त्यांचे निदान व त्यावरील उपचार व प्रतिबंध याची पूर्ण माहिती दिली जाते. सध्या रुग्णांमध्ये होणारा स्टिरॉइड या औषधाचा गैरवापर, त्वचारोगासंदर्भात असलेले गैरसमज दूर करणे, इतर त्वचा रोगांविषयी जनजागृती करणे आणि उपचार त्वचारोग तज्ज्ञांकडूनच घेणे कसे फायद्याचे आहे अशा काही विषयांवर जनजागृती करणारे हे व्हिडिओ आहेत. हा रथ दिल्लीहून निघाला असून 18 राज्यातून 11 हजार किलोमीटरचा प्रवास करून परत दिल्लीला जाणार आहे. रोज वेगवेगळ्या शहरात रथ थांबवून तिथे असलेले त्वचा रोग तज्ञ त्याचे स्वागत करतात आणि लोकांना मार्गदर्शन करतात. महाराष्ट्रामध्ये मुंबई-पुण्यानंतर या रथाचा मान सातार्‍याला मिळाला आहे. सातार्‍यात या रथाचे स्वागत सर्व त्वचारोग तज्ज्ञांतर्फे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात करण्यात आले. शहरातील त्वचा रोगतज्ञ डॉ. सुरेश महाजन, डॉ. मोहन पाटील, डॉ. सुनील पटवर्धन, डॉ. सुधीर बक्षी, डॉ. अजित सुरले-पाटील, डॉ. किरण जगताप, डॉ. रोहन पाटील, डॉ. अण्णासाहेब कदम, डॉ. शारदा भास्कर यांची यावेळी उपस्थिती होती. महाराष्ट्र आय. ए. डी. व्ही. एल. च्या जॉईंट सेक्रेटरी डॉ. विनयश्री मेनेकर, महाराष्ट्र आय. ए. डी. व्ही. एल.चे मॅनेजिंग कमिटी मेंबर डॉ. आदित्य महाजन हे स्टेट असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमानंतरच्या चर्चासत्रात कोणत्याही रुग्णांनी मेडिकल दुकानातून तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत तसेच केमिस्टने प्रिस्क्रिप्शन शिवाय स्टिरॉईड, अँटिबायोटिक्स, मिथोट्रेक्झेट अशा प्रकारची औषधे रुग्णांना देऊ नयेत यावर सर्वांचे एकमत झाले. स्टिरॉइड क्रीमचा वापर स्वत:हून किंवा मित्राच्या सांगण्यावरून करू नये, असे सर्व डॉक्टर म्हणाले.स्टिरॉइडच्या गैरवापराबद्दल डॉक्टरांनी माहितीपत्रके वाटली. जिल्हा रूग्णालयानंतर हा रथ बॉम्बे रेस्टॉरंट चौकात गेला आणि तिथे जन जागृती व पत्रकांचे वाटप करण्यात आले. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातार्‍यातून हा रथ गोवा राज्याकडे रवाना झाला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: