Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न
ऐक्य समूह
Tuesday, January 08, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: mn2
सुरक्षा जाळीमुळे तरुणाचे प्राण वाचले
5मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) : मंत्रालयात सोमवारी पुन्हा एकदा एका तरुणाने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, मागच्या वर्षी एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर बसवण्यात आलेल्या सुरक्षा जाळीत अडकल्यामुळे या तरुणाचा जीव वाचला. लक्ष्मण आप्पासाहेब चव्हाण असे या तरुणाचे नाव असून तो प्रजासत्ताक भारत पक्ष नावाच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे.
सरकार दरबारी खेटे मारूनही न्याय मिळत नसल्याने गेल्या वर्षी धर्मा पाटील या वयोवृद्ध शेतकर्‍याने मंत्रालयातच विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर हर्षल रावते याने मंत्रालयात उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येचे सतत प्रयत्न होत असल्याने मंत्रालयात व आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या मधल्या चौकात सुरक्षा जाळीही बसवण्यात आली आहे. त्यानंतर हे सत्र थांबले होते; पण सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास लक्ष्मण चव्हाण नावाच्या व्यक्तीने सहाव्या मजल्यावरून या जाळीवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला.
शेतकरी आत्महत्या, कुपोषण आदी विषयासंदर्भात या तरुणाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ही भेट होऊ शकली नाही. त्यानंतर त्याने मंत्रालयातील पत्रकार कक्षात येऊन निवेदनाची प्रत दिली आणि नंतर सहाव्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारली. आत्महत्येचे प्रकार रोखण्यासाठी दुसर्‍या मजल्यावर जाळी बसवण्यात आली असून या जाळीवर हा तरुण पडल्याने सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. तेथून त्याला खाली उतरवण्यासाठी सुरक्षारक्षकांची धावपळ उडाली होती. मात्र, हा तरुण खाली उतरण्यास तयार
नव्हता. जाळीवर बसून हातातील बॅनर फडकवत त्याची
घोषणाबाजी सुरू होती.
अखेर बाळासाहेब रणखांबे या पोलीस शिपायाने व वन विभागातील कर्मचारी राजेश नामदास यांनी जाळीवर उडी घेऊन त्याला जबरदस्तीने खाली उतरवले. सर्कसमध्ये चालतो तसा पाठशिवणीचा थरारक खेळ वीस मिनिटे सुरू होता.
      
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: