Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
श्री सेवागिरी देवस्थान सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे केंद्र : राजेघाटगे
ऐक्य समूह
Monday, January 07, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: re4
5पुसेगाव, दि. 6 : ग्रामीण भागातील कलाकारांच्यात खूप प्रोटेन्शिअल भरलेले आहे. मात्र त्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळत नसल्याने हे कलाकार मागे पडतात. मात्र सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे केंद्र असलेल्या पुसेगावच्या श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने भागातील कलाकारांच्या सुप्त गुणांना या युवा महोेत्सवाच्या व्यासपीठाद्वारे वाट मोकळी करून दिली आहे. याचा लाभ घेऊन भागातील कलाकार राष्ट्रीय पातळीवर आपल्या कलागुणांचा आविष्कार करत उत्तुंग कामगिरी करतील, असा विश्‍वास महाराष्ट्र राज्याचे वित्त विभागाचे उपसचिव व बुध (ता. खटाव) गावचे सुपुत्र वैभव राजेघाटगे यांनी केले.
येथील श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेत आयोजित केलेल्या युवा महोत्सवाचे उदघाटन शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसचिव वैभव राजेघाटगे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे सहाय्यक धर्मादाय आयुक्त ईश्‍वर सूर्यवंशी, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहिदास पवार, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्‍वस्त मोहनराव जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेश जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, एम. आर. जाधव, बाळासाहेब जाधव,  एम. आर. जाधव, युवा उद्योजक महेश वाघ, प्राचार्य डॉ संजय कांबळे, प्रा. सुधीर इंगळे,  प्रा. डी. पी. शिंदे, मुख्याध्यापिका श्रीमती संध्या चौगुलै, प्रा. संजय क्षीरसागर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गंगाधर म्हमाणे म्हणाले, देवस्थान ट्रस्ट अध्यात्माबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. शासकीय विद्यानिकेतनकडून 32 एकर जागा पुन्हा देवस्थानला मिळण्याचा मार्ग पूर्णत: मोकळा झाला आहे. यापुढेही देवस्थान ट्रस्टच्या कोणत्याही शैक्षणिक उपक्रमासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करणार आहेे.
ईश्‍वर सूर्यवंशी म्हणाले, खूप मोठा निधी मिळूनही केवळ धार्मिक क्षेत्रातच काम करणारी देवस्थाने भरपूर आहेत. मात्र धार्मिक उत्सवापुरतेच मर्यादित न राहता सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात हिरीरिने भाग घेत मोठे योगदान देणारे पुसेगावचे सेवागिरी देवस्थान एकमेव आहे.
रोहिदास पवार म्हणाले, दिवसंदिवस बेरोजगारीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. युवकांनी शिक्षणानंतर केवळ नोकरीच्या मागे न लागता आपल्यातील कलागुणांचा, कौशल्याचा वापर करून भावी जीवनात एक आदर्श नागरिक बनण्यासाठी धडपड करावी.
डॉ. सुरेश जाधव म्हणाले, आजची युवा पिढी चांगल्या मार्गाला गेली तरच देशाची प्रगती होईल. त्यांच्या विचारांना देवस्थानच्या माध्यमातून युवा महोत्सवाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. याचा लाभ भागातील युवकांनी घ्यावा. परिसरातील अंध, दिव्यांग व उपेक्षित कलाकारांच्या उध्दारासाठी देवस्थान ट्रस्ट सर्वोतोपरी सहकार्य करेल. मोहन गुरव यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. प्रताप जाधव यांनी आभार मानले.
आज विभागीय शरीर सौष्ठव स्पर्धा
यात्रा स्थळावर उभारण्यात आलेल्या सेमिनार हॉलमध्ये सायंकाळी 5 वाजता होणार्‍या या स्पर्धेत 50 ते 55, 55 ते 60, 60 ते 65, 65 ते 70, 70 ते 75, 75 ते 80 व 80 किलो वजन  गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. श्री सेवागिरी किताब 2019 च्या मानकर्‍यास 10 हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच बेस्ट पोझिंग व बेस्ट मस्क्युलर- साठी स्वतंत्र बक्षिसे देण्यात येणार आहेत.
आज श्‍वान शर्यती
 श्री सेवागिरी महाराजांच्या 71 व्या पुण्यस्मरणार्थ सोमवार, दि. 7 रोजी सकाळी 11 वाजता यात्रास्थळावर भव्य श्‍वान शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहेत. अंतिम फेरीतील प्रथम सात विजेत्या श्‍वान मालकांना अनुक्रमे 35 हजार रुपये, 25 हजार रुपये, 15 हजार रुपये, 10 हजार रुपये, 6 हजार रुपये, 5 हजार रुपये, 2 हजार रुपये तर आठ ते बारा क्रमांकांना प्रत्येकी 1 हजार रुपयेे रोख रक्कम, चषक व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.  स्पर्धेदिवशी दुपारी 10.30  च्या आत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक श्‍वानास 500 रुपये प्रवेश फी आकारण्यात आली आहे. श्‍वानांच्या अटी-तटीच्या शर्यतीचा निकाल थर्ड अंपायर (व्हिडिओ कॅमेरा) द्वारे देण्यात येईल. सातारा-पंढरपूर रस्त्यालगत शिवराज मंगल कार्यालयाच्या शेजारी या स्पर्धा होणार आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: