Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यातील दुष्काळ निर्मूलनासाठी केंद्राकडे 7 हजार कोटींचा प्रस्ताव
ऐक्य समूह
Wednesday, November 07, 2018 AT 10:56 AM (IST)
Tags: mn3
5उस्मानाबाद, दि. 6 (वृत्तसंस्था) : राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला दिलासा देण्याकरता केंद्र सरकारकडे 7 हजार कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच केंद्राचे पथक राज्याच्या दुष्काळ पाहणी दौर्‍यावर येणार आहे. कृष्णा मराठवाडा प्रकल्पाकरता राज्य सरकारने नाबार्डकडे 2 हजार 200 कोटी रुपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव सादर केला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुष्काळ आणि कायदा सुव्यवस्था आढावा बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्याकरता आपण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्याकरता तसेच पाणीटंचाई, चार्‍याचा प्रश्‍न यासह विविध अनुदानांसाठी केंद्राकडे आपण 7 हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. आपल्या मागणीनंतर त्याची छाननी केली जाईल आणि राज्यात केंद्र सरकारच्यावतीने आपण केलेल्या तपासणीची खात्री करण्याकरता किती पथक पाठवायचे याचा निर्णय होईल. त्यानंतर आपल्या मागणीप्रमाणे केंद्राकडून नक्की मदत मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.अनेक वर्षांपासून रखडलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पास पर्यावरण मान्यताही मिळाली आहे. आजवर या प्रकल्पाकरता 800 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. चार वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प वेगाने पुढे नेण्याकरता सर्वतोपरी परिश्रम घेण्यात आले आहेत. निश्‍चित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी राज्य सरकारच्यावतीने नाबार्डकडे 2200 कोटी रुपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात आघाडी शासनाच्या काळात झालेल्या सिंचन घोटाळ्याची कारवाई सुरू आहे. या प्रकरणी आजवर 25 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. यातील सर्व दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: