Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खंडाळा येथे दोन दुचाकींच्या अपघातात बालकाचा मृत्यू
ऐक्य समूह
Tuesday, November 06, 2018 AT 10:58 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 5 : दोन दुचाकींचा खंडाळा येथील संभाजी चौकात रविवारी रात्री अपघात झाला. यामध्ये जखमी झालेल्या स्वराज रविकिरण पोरे (वय 9 महिने, रा. देऊर, ता.कोरेगाव) या  बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिवाळीसाठी घरी जात असताना हा अपघात घडला. या घटनेनंतर माता-पितांनी केलेला आक्रोेश काळीज पिळवटून टकणारा होता. या घटनेने देऊर परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात बालकाची आई जखमी झाली असून   तिला उपचारासाठी सातार्‍यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,  लोणावळा येथील व्हॅलीमध्ये रविकिरण पोरे हे नोकरीस आहेत. ते त्या ठिकाणी पत्नी अमृता आणि मुलगा स्वराज यांच्यासमवेत राहण्यास होते. दिवाळीसाठी त्यांनी देऊर येथील घरी येण्याचे ठरवले होते. रविवारी दुपारच्या सुमारास रविकिरण हे पत्नी अमृता आणि स्वराज यांना घेवून दुचाकीवरून लोणावळा येथून देऊरकडे निघाले.  
रात्री आठच्या सुमारास ते दुचाकीवरून खंडाळा येथील संभाजी चौकात आले होते. या दरम्यान त्यांच्या दुचाकीला समोरून येणार्‍या दुचाकीने जोराची धडक दिली. या धडकेमुळे पाठीमागे मांडीवर घेवून बसलेल्या स्वराजसह अमृता  खाली पडल्या. दुचाकीवरून खाली पडल्याने स्वराज यास गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर स्वराज व अमृता यांना उपचारासाठी खंडाळा येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना लोणंद व तिथून पुढे
सातारा येथे आणण्यात आले. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात झालेल्या वैद्यकीय तपासणीअंती स्वराज याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची प्राथमिक नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: