Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने तारांबळ
ऐक्य समूह
Monday, November 05, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: mn1
5सातारा, दि. 4 : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सातारा शहरासह उपनगरात झालेल्या पावसाच्या दमदार हजेरीमुळे दिलासा मिळाला असला तरी ऐन दिवाळी सणात खरेदीसाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांबरोबरच रस्त्यावर छोट्या मोठ्या वस्तू विक्रीसाठी बसलेल्या विक्रेत्यांची मात्र चांगलीच दैना झाली. मात्र या पावसामुळे नुकसान झाले किंवा नाही हे कळू शकले नाही.
कर्नाटकजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या शिवाय भारताचे स्वर्ग असलेल्या काश्मीरमध्ये गेल्या नऊ वर्षात प्रथमच नोव्हेंबरमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. काश्मीरबरोबरच हिमाचल प्रदेशच्या विविध भागात कालपासूनच बर्फवृष्टी होत असल्यामुळे त्याचाही काहीसा परिणाम हवामान बदलावर झाला आहे. शनिवारी उपनगरामध्ये पावसाने चांगली हजेरी लावली असली तरी शहरात मात्र शिडकावा झाला होता. त्यामुळे उकाडा पुन्हा वाढला होता. परंतु रविवारी दुपारपासूनच आकाशात काळे ढग दाटून आले होते. पाचच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसास सुरूवात झाली. सुरूवातीला थेंब थेंब पडणार्‍या पावसाने नंतर मात्र जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. तालुक्याच्या अनेक भागात ज्वारीची पेरणी केली आहे. त्यामुळे आज झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. गव्हाच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणारा आहे.
बाजारपेठत खरेदीसाठी आलेल्यांची दैना
रविवारी दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसु बारस शिवाय रविवार हा चाकरमान्यांचा सुट्टीचा दिवस. त्यामुळे बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी सातारकर बाहेर पडले होते. परतीचा पाऊस बरसलाच नसल्यामुळे हवामान खात्यानेही दूरपर्यंत कोठेही पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तविला होता.
 परंतु अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे झालेल्या पावसामुळे सर्वांचीच दैना उडवून टाकली. अचानक झालेल्या या पावसामुळे बाजारपेठेत रांगोळी, पणत्या, किल्ल्यावर मांडण्यात येणारे सैनिक, केरसुणी, आकाशकंदील, लाह्या बतासे, लक्ष्मीच्या प्रतिमा विक्रीसाठी रस्त्यावर बसलेल्या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांची पावसाने चांगलीच फजिती केली. आपल्या मालाचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान होवू नये म्हणून तो सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी त्यांची पळापळ झाली. या शिवाय दुकानदारांनी दुकानाबाहेर लावलेले कपडे तसेच इतर साहित्यही या पावसात भिजले. त्यांचीही हे साहित्य काढताना चांगलीच तारांबळ झाली.
गेल्या दिवाळीच्या आठवणी ताज्या
वडूज परिसरात ऐन दिवाळीत सलग दोन दिवस झालेल्या परतीच्या पावसाने लाखो रुपयांची हानी झाली होती. सलग दोन दिवस वरुड, नागाचे कुमठे, नायकाचीवाडी परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे कुमठे, विठोबाचा माळ मार्गे नायकाचीवाडी गावातून येरळा नदीकडे वाहणार्‍या ओढ्यास महापूर आला. अशा प्रकारचा पूर गेल्या 20 वर्षांत आला नव्हता. ऐन दिवाळीत अशा प्रकारची हानी झाल्याने व्यापारी वर्गातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. नेमक्या त्या आठवणी आज सातारा शहर व उपनगरात झालेल्या पावसाने ताज्या झाल्या होत्या.
दुष्काळी भागातील लोकांच्या आशा पल्लवित
राज्य शासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला तरी सातारा जिल्ह्यातील खटाव, खंडाळा या तालुक्यांचा अद्याप दुष्काळी तालुक्यात समावेश केला नसल्यामुळे शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या तालुक्यांची मदार असते ती परतीच्या पावसावर. या तालुक्यांमध्ये परतीचा पाऊस चांगल्याप्रकारे होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा-पाण्याचा बराचसा प्रश्‍न सुटतो. परंतु यंदा परतीच्या पावसाने या तालुक्यांकडे पूर्णपणे पाठ फिरवली असल्यामुळे तसेच पाण्याची पातळी खालावल्यामुळे या तालुक्यांवर दुष्काळाचे मोठे सावट आहे. अशात हवामान बदलामुळे दोन चार दमदार पाऊस झाले तरी या तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न काही अंशी सुटण्यास मदत होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. आज ना उद्या आपल्या तालुक्यातही पाऊस हजेरी लावेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: