Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा तालुक्यातील ऊस तोड शेतकरी संघटनेने थांबवली
ऐक्य समूह
Saturday, November 03, 2018 AT 11:40 AM (IST)
Tags: lo1
दर जाहीर होईपर्यंत आंदोलन सुरुच
5सातारा, दि. 2 : एफआरपी प्लस दोनशे रुपये असा दर कारखानदारांनी जाहीर करावा या मागणीसाठी सातारा जिल्ह्यात जोरदार आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सातारा तालुक्यातील नेले, किडगाव, कामेरी, लिंब या गावांमधील ऊस तोड थांबवून आपला हिसका दाखवला. दरम्यान, जोपर्यंत कारखानदार दर जाहीर करत नाहीत तोपर्यंत गनिमी काव्याने आंदोलन सुरु राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला.  
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी सकाळपासून सातारा तालुक्यातील नेले, किडगाव, लिंब, कामेरी, फत्यापूर, देशमुखनगर, अपशिंगे मिल्ट्री, तारगाव, नांदगाव या गावात जेथे जेथे उसाची तोड सुरु होती तेथे तेथे  कारखानदारांच्या टोळ्यांना व फड मालकांनाही ऊस तोड करु नका, अशी विनंती केली आणि तोडी बंद केल्या आहेत.
जिल्ह्यातील कारखानदार एफआरपी प्लस 200 रुपये असा दर आणि मागची बिले देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. आम्हीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिल्ह्यात जन्माला आलो आहे. आम्ही शेतकरी आहोत. शेतकर्‍याला शेती पिकवताना किती यातना होतात हे एसीत बसलेल्यांना काय समजणार, असा सवाल शेळके यांनी केला आहे. दिवाळी गोड व्हावी असे वाटत असेल तर त्यांनी लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरुन दिवाळी गोड जाईल. परंतु निर्णय जर घ्यावा असे वाटत नसेल तर आमच्या रक्तात गनिमी कावा कसा करायचा हे चांगलेच ज्ञात आहे. आम्ही शेतकर्‍यांची पोरं आहोत, आम्हाला आंदोलन कसे करायचे याचा इशारा द्यायची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: