Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपविरोधी आघाडीसाठी मोर्चेबांधणी
ऐक्य समूह
Friday, November 02, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: na1
चंद्राबाबूंनी घेतली राहुल गांधी, शरद पवारांची भेट
5नवी दिल्ली, दि. 1 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलेल्या तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या आठवडाभरात नवी दिल्लीचा दुसर्‍यांदा दौरा करणार्‍या नायडूंनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांची भेट घेऊन चर्चा केली. देश आणि देशातील स्वायत्त संस्था वाचवण्यासाठी सर्व मतभेद विसरून आपण एकत्र आल्याचे राहुल गांधी व चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.
2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात एकजूट घडवण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. मात्र, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाकडून सर्वपक्षीय आघाडीच्या प्रयत्नांमध्ये कोलदांडा घातला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आंध्रचे मुख्यमंत्री आणि रालोआमधून बाहेर पडलेल्या तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी विरोधकांमध्ये एकजूट घडवण्याचा विडा उचलला आहे. गेल्या आठवडाभरात चंद्राबाबूंनी आज दुसर्‍यांदा दिल्लीचा दौरा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत तिन्ही नेत्यांनी पुढील रणनीतीवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन देश आणि
लोकशाही वाचवण्यासाठी भाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. देश मोठ्या संकटातून जात आहे. लोकशाही आणि घटनात्मक संस्थांची स्वायत्तता धोक्यात आली आहे. यामुळे आम्ही एकत्र येणे आवश्यक आहे. विरोधी पक्षांनी एकजूट दाखवल्यास देश, लोकशाही आणि प्रमुख संस्था वाचवता येतील, असे फारुक अब्दुल्ला म्हणाले.
चंद्राबाबू नायडू-राहुल गांधी भेट
पवार आणि अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी दुपारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना साथ देण्याचे आवाहन नायडू यांनी राहुल गांधींना केले. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भातही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी नायडू रालोआमध्ये होते. आमच्यात काही मतभेदही होते. मात्र, देशातील लोकशाही आणि स्वायत्त संस्था वाचवण्यासाठी हे मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे, असे राहुल गांधींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी नायडूंसोबत तेलगू देसमचे काही वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.
  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: