Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
किडगाव येथे दोन गटात जोरदार धुमश्‍चक्री
ऐक्य समूह
Friday, October 12, 2018 AT 11:31 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 11 :   किडगाव, ता.सातारा येथील महादेव मंदिर आणि ग्रामपंचायतीजवळ ट्रॅक्टर पुढे घेतल्याच्या कारणावरून बुधवारी रात्री दोन गटात धुमश्‍चक्री झाली. या घटनेत   सहा जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटाने परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणी 20 जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी रात्री ज्ञानेश्‍वर राजाराम वाघमळे हे ट्रॅक्टर घेवून गावातील महादेव मंदिराजवळ असणार्‍या तिकाटण्यावर आले होते. या मार्गावरून देवीची मिरवणूक निघाली होती. देवीची मिरवणूक आणि  एका पाठोपाठ दोन बसेस तेथे आल्याने वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे वाघमळे यांनी ट्रॅक्टर पुढे घेतला. यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून अक्षय विठ्ठल इंगवले, अक्षय मारुती इंगवले, गौरव प्रदीप इंगवले, मयूर संपत इंगवले, प्रवण शंकर टिळेकर, अनिकेत राजेंद्र इंगवले व इतर 10 ते 12 जणांनी लाकडी दांडक्याने वाघमळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्यांवरही त्यांनी हल्ला चढवला. यामध्ये सुहास जाधव, भागवत जाधव, अक्षय जाधव, ओमकार जाधव, अमजद कुरेशी हे लाकडी दांडकी, दगड लागल्याने जखमी झाले आहेत. वाघमळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गौरव इंगवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दुसर्‍या गटाकडून संगीता प्रदीप इंगवले यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  तक्रारीत म्हटले आहे, की दि. 10 रोजी रात्री साडेसातच्या सुमारास राहत्या घराजवळ आणि गावातील कॅनॉलजवळ जमावाने अक्षय विठ्ठल इंगवले याला मारहाण केली असून जमावाने घरात घुसून मुलगा कोठे आहे, असे विचारत तुम्हाला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार ज्ञानेश्‍वर राजाराम वाघमळे, अमजद रमजान मोकाशी, हनुमान जाधव, भागवत जयसिंग जाधव, ओंकार महादेव जाधव, सुहास शिवाजी जाधव, अक्षय भानुदास जाधव, पप्या ननावरे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या मारहाणीत अक्षय विठ्ठल जाधव हा जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  उपनिरीक्षक विजय चव्हाण व गीते तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: