Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खोट्या धनादेशाद्वारे तीन लाखाचे काजू खरेदी करून व्यापार्‍याची फसवणूक
ऐक्य समूह
Friday, October 12, 2018 AT 11:35 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 11 :  कोडोली येथील होलसेल किराणा दुकानातून 3 लाख रुपयांचे 380 किलो काजू  खरेदी करताना खोटा धनादेश देवून फसवणूक करणार्‍यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत मोरया मेगा मार्टचे मालक कुमार बाळासाहेब चव्हाण (रा. कर्मवीरनगर, कोडोली) यांनी  तक्रार दिली आहे. चव्हाण यांचे होलसेल किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानात दि. 5 रोजी दुपारी चारच्या सुमारास फसवणूक करणारी अनोळखी व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीने चव्हाण यांना मोठ्या प्रमाणात काजू आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार चव्हाण यांनी त्याला दुकानात असणारे काजूचे विविध प्रकार दाखवले. यापैकी एका प्रकारच्या काजूची निवड करत त्या व्यक्तीने चव्हाण यांच्याकडून 3 लाख 2 हजार रुपये किंमतीचे 380 किलो काजू खरेदी केले. खरेदी केलेल्या काजूच्या बदल्यात पैसे देण्याऐवजी त्या व्यक्तीने दुकानदार चव्हाण यांना आयसीआयसीआय बँकेच्या नावाचा धनादेश दिला. मात्र तो धनादेश  खात्यात वटण्यासाठी भरला असता तो वटला नाही.
संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होवू शकला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याची बुधवारी रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: