Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यातील सर्व सैनिकी शाळांचा आढावा घेणार
ऐक्य समूह
Friday, October 12, 2018 AT 11:36 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) :राज्यात 39 अनुदानित आणि तीन विनाअनुदानित सैनिकी शाळा असून या शाळांमधून किती विद्यार्थी प्रत्यक्ष सैन्यात भरती झाले, याचा आढावा राज्य सरकार घेणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
राज्यात सैनिकी शिक्षण देणार्‍या सैनिकी शाळा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली होती. प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे 30 शाळा सुरू करण्याची परवानगी 1995 मध्ये देण्यात आली होती. या योजनेनुसार खासगी स्वयंसेवी संस्थांमार्फत जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांची एक सैनिकी शाळा सुरू करण्याचा आणि प्रत्येक महसुली विभागात मुलींची एक सैनिकी शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या शाळा पूर्णपणे निवासीशाळा आहेत. सध्या राज्यात 39 अनुदानित आणि तीन विनाअनुदानित सैनिकी शाळा आहेत.
या शाळांमधून आतापर्यंत किती विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे प्रत्यक्ष सैन्यात भरती झाले, याचा आढावा घेण्याचे निर्देश राज्य मंत्रिमंडळाने मे महिन्यात दिले होते. त्यासाठी सचिवस्तरीय समिती नेमण्यात येणार होती. आता शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. किती विद्यार्थी प्रत्यक्ष सैन्यात भरती झाले, याची माहिती घेण्याबरोबर सैनिकी शाळांच्या कामगिरीचा ही समिती आढावा घेणार आहे. त्याचबरोबर या शाळांच्या कामगिरीत सुधारणा करण्याच्या शिफारशीदेखील ही समिती सरकारला करणार आहे. या समितीला सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: