Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हवामान बदलामुळे स्वाईन फ्लूचा प्रभाव वाढला
ऐक्य समूह
Friday, October 12, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: mn2
राज्यात 16 हजार रुग्ण, 199 जणांचा मृत्यू
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : हवामानातील बदलांमुळे राज्यात स्वाईन फ्लूचा प्रभाव वाढला असून जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत 199 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज सांगितले. नागरिकांनी सर्दी, ताप, घसादुखीचा आजार अंगावर काढू नये. औषधोपचारानंतर 24 तासात बरे वाटले नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमीफ्लूच्या गोळ्या सुरू कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लू संशयित 16 हजार रुग्ण दाखल असून त्यांच्यावर खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. राज्य शासनाने साथरोग नियंत्रणासाठी नेमलेल्या समितीची गेल्या आठवड्यात बैठक झाली. त्यावेळी व्हेंटिलेटरवर असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर करायच्या उपचारांमध्ये एकसूत्रीपणा यावा यासाठी औषधोपचारांचा प्रोटोकॉल करण्याबाबत चर्चा झाली. पुढील दोन दिवसांत हा प्रोटोकॉल राज्यातील सर्व खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांना पाठविण्यात येईल. त्यानुसार त्यांनी स्वाईन फ्लूबाधित रुग्णांवर उपचार करणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात खासगी रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांचे ‘डेथ ऑडिट रिपोर्ट’ मिळत असून त्यात औषधोपचारास विलंब हे एक प्रमुख कारण आढळले आहे. काही रुग्णांनी स्वत: सर्दी, तापावर गोळ्या,  औषधे घेऊन आजार अंगावर काढला. आठवड्याभरानंतरही प्रकृतीत फरक न पडल्याने त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतल्याचे दिसून आले. स्वाईन फ्लूवर वेळेत उपचार न सुरू झाल्याने मृतांची संख्या वाढली. सर्दी, ताप, घसादुखी 24 तासांच्या आत बरी न झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने
टॅमीफ्लू गोळ्यांचा डोस सुरू करावा. कुठल्याही परिस्थितीत आजार अंगावर काढू नका. मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
हवामानातील बदल स्वाईन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक असल्याचे दिसून येत आहे. हवेच्या माध्यमातून आणि संसर्गातून विषाणूंचा फैलाव होतो, अशा वेळी शिंकताना आणि खोकताना नाकातोंडावर रूमाल धरावा, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: