Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी?
ऐक्य समूह
Thursday, October 11, 2018 AT 10:43 AM (IST)
Tags: mn1
काही मंत्र्यांना डच्चू; नव्या चेहर्‍यांना संधी
5मुंबई, दि. 10 (वृत्तसंस्था) : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी म्हणजे 12 किंवा 13 ऑक्टोबरला हा विस्तार होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात काही जणांना डच्चू मिळण्याची आणि काही नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही मंत्र्यांच्या खातेपालटाची शक्यताही आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होणार, अशी चर्चा गेले कैक महिने सुरू आहे. अनेकदा तारखाही जाहीर होत होत्या. मात्र, मुख्यमंत्री हा विस्तार लांबणीवर टाकत होते. मात्र, आगामी लोकसभा आणि त्यानंतर राज्याच्या विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेने वेग घेतल्याचे समजते. त्यासाठी नवरात्रीचा मुहूर्त निश्‍चित करण्यात आला आहे. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याने देवेंद्र फडणवीस सरकारचा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असेल. या विस्तारात कोणत्या नव्या चेहर्‍यांचा समावेश होणार आणि विद्यमान मंत्र्यांपैकी कोणाला डच्चू मिळणार, याची उत्सुकता आहे. औरंगाबादमध्ये आज बोलताना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करण्याचे सुतोवाच केले, पण तारीख जाहीर केली नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निकटच्या सूत्रांनुसार येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.
राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच झालेली बैठक आणि भाजप आमदार व खासदारांच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने वेग घेतला होता. सध्या मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्याच्या चार जागा रिक्त आहेत तर शिवसेनेच्या कोट्यातील सर्व जागा भरलेल्या आहेत. मात्र, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे डॉ. सावंत यांना विधानपरिषदेवर आणि मंत्रिमंडळात पुन्हा संधी देणार की, अन्य कोणा नव्या चेहर्‍याला संधी देणार, हे गुलदस्त्यात आहे.
मात्र, या विस्तारात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, गृह राज्यमंत्री रणजित पाटील व उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे या भाजपच्या मंत्र्यांना डच्चू मिळेल, अशी चर्चा आहे. सावरा आणि बडोले यांच्या कामगिरीवर मुख्यमंत्री खूश नसल्याची चर्चा आहे. रणजित पाटील आणि प्रवीण पोटे यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमुळे राज्य सरकारला जेमतेम सात-आठ महिने मिळणार आहेत. त्यामुळे कामाचा उरक असलेल्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या आ. आशिष शेलार, आ. संजय कुंटे, आ. अनिल बोंडे व आ. भाई गिरकर यांच्या नावाची चर्चा असून त्यांनी मंत्रिपदासाठी जोरदार मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष असलेले आ. शेलार हे पक्षाध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री फडणवीस या दोघांचेही विश्‍वासू मानले जातात. शिवाय ते धडाडीचे नेते आहेत. त्यामुळे यावेळी तरी त्यांची वर्णी लागणार का, याची उत्सुकता आहे. मुख्यमंत्र्यांनी विस्ताराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. त्याचबरोबर कोणाची खाती बदलली आणि कोणाला वगळून पक्षात जबाबदारी दिल्यास नाराज होऊ नये, असा निरोप मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील सहकार्‍यांना दिल्याचे वृत्त आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: