Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नवरात्रातही डॉल्बी वाजणार नाही
ऐक्य समूह
Wednesday, October 10, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: lo4
आजपासून अंमलबजावणी सुरू
5सातारा, दि. 9 : सातार्‍यात पोलिसांनी डॉल्बीविरोधात आपली मोहीम तीव्र केली आहे. गणेशोत्सवात डॉल्बी वाजू न देण्यात पोलीस यशस्वीझाले होते. गणेशोत्सवाप्रमाणेच पोलिसांनी नवरात्रीतही डीजेबंदी यशस्वी करण्यासाठी ठोस पावले टाकली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून 144 प्रमाणे पोलिसांना डीजेबाबत अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांना सर्व डीजे जागीच सील करण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे नवरात्रातही सातारा जिल्ह्यात डॉल्बी वाजणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे घटस्थापनेपासून म्हणजे बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, डॉल्बी वाजू द्यायची नाही, असा निर्धार पोलिसांनी गणेशोत्सवात केला होता आणि तो यशस्वीही करुन दाखवला होता. आता तसाच निर्धार त्यांनी नवरात्रोत्सवासाठी केला असून त्यासाठी ठोस पावले टाकली आहे. नवरात्रीनिमित्त  नऊ दिवस देवीचा जागर होत आहेे. नवरात्रीनिमित्त दांडियाच्या माध्यमातून व दुर्गादेवीच्या  मिरवणुकीत डॉल्बीचा वापर  होण्याची शक्यता  असते. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी गणेशोत्सवावेळी जी भूमिका घेतली तीच यावेळीही घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाशी याबाबत पत्रव्यवहार केला. नवरात्रीच्या निमित्ताने डॉल्बी जागीच सील करण्याची परवानगी पोलिसांना मिळावी, अशी मागणी केली. अप्पर जिल्हादंडाधिकारी सचिन बारावकर यांनी पोलिसांच्या या भूमिकेवर लगेचच सकारात्मक ऑर्डर करत डॉल्बी जागीच सील करण्याची परवानगी दिली. त्यामुळे दि. 10 ते 19 ऑक्टोबर या कालावधीसाठी डॉल्बी मालकांनी आपल्या ताब्यातील डॉल्बी बाहेर काढू नये आणि ती सर्व यंत्रणा सीलबंद स्वरुपात ठेवावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबत कोणी उल्लंघन केले तर पोलिसांकडून त्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: