Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खा. उदयनराजेेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
ऐक्य समूह
Wednesday, October 10, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: mn2
राजकीय चर्चा झाली, निर्णय योग्य वेळी घेईन : उदयनराजे
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे सातार्‍याचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विकासकामानिमित्त भेट झाल्याचे सांगताना राजकीय चर्चा झाल्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र, लोकसभा निवडणूक कोणाकडून लढवणार, या प्रश्‍नाला थेट उत्तर देण्याचे टाळताना याबाबत योग्य वेळी निर्णय घेईन, असे सूचक वक्तव्य उदयनराजेंनी केले. आरक्षणाबाबतच्या प्रश्‍नावर उत्तर देताना, आरक्षण हे गुणवत्ता व आर्थिक निकषांवर दिले जावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सातार्‍यातून उदयनराजेंना लोकसभेची उमेदवारी देण्यास विरोध झाल्याची चर्चा आहे. रविवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीला उदयनराजेही बर्‍याच उशिराने आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी, सातार्‍यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पवार-साहेब अंतिम निर्णय घेतील, असे सांगितले होते. त्याच वेळी, मला विरोध झाला तरी माझ्यावर प्रेम करणार्‍या व्यक्तींची संख्या जास्त आहे. अनेकांचा मला पाठिंबा आहे. पवारसाहेबांचे जसे अन्य पक्षांमध्ये मित्र आहेत तसेच आपलेही अन्य पक्षांमध्ये मित्र असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आज मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे स्वाभाविकच अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत विरोधकांची खिल्ली उडवली. पक्षाच्या बैठकीत उदयनराजे नको, कुणीही चालेल, असे कोणी तरी म्हणल्याचे ऐकले. मला आडवं करायचं चाललंय. त्यांना तसं वाटत असेल तर हरकत नाही. कोणाला वाटत असेल, की मी उदयनराजेंपेक्षा जास्त मतांनी निवडून येईल, त्याने आकडे दाखवावेत, मी त्याच्या प्रचाराचे काम करतो. माझी हौस भागली आहे. आमदारकी लढवली, खासदारकी लढवली.  
त्यामुळे आता निवडणूक लढवलीच पाहिजे, असा माझा आग्रह नाही. सामान्य जनता हाच माझा पक्ष आहे. त्यांची इच्छा असेल तर निवडणूक लढवेन अन्यथा नाही, असे उत्तर उदयनराजे यांनी दिले. आगामी निवडणूक लढवली तर कोणत्या पक्षाकडून लढवणार, असे वारंवार विचारले गेले तेव्हा, अजून बराच वेळ आहे, एवढी घाई कशाला, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. राष्ट्रवादीने सातारा सोडून इतर ठिकाणी लढण्यास सांगितले तर लढणार का, या प्रश्‍नावर, आता कुठं लढू? चंद्रावर का, असा सवालही त्यांनी केला. शरद पवार यांनीही आता तुमची स्टाईल उचललीय, असे म्हटले असता, आता ही माझी स्टाईल आहे. कोण कोणाची स्टाईल उचलतं, हे मला काय माहिती, अशी मिश्कील टिप्पणणीही त्यांनी केली.
आर्थिक निकषावर आरक्षण असावे
आरक्षणाबाबतच्या मागण्यांसंदर्भात विचारले असता, भविष्यात मेरिट हाच निकष असेल आणि आरक्षण हे आर्थिक निकषांवरच दिले जायला हवे, असे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणाबाबत विचारले असता, बहुतांश मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, उदयनराजे यांनी मुख्यमंत्रांबरोबर इतरांच्याही गाठीभेटी घेतल्या. त्यांनी गिरीश महाजन यांच्याशी 40 मिनिटे चर्चा केली. तेथून ते चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला गेले. मात्र, ना. पाटील त्यांच्या दालनात नव्हते. ते दुपारी उशिरा दालनात आले. तेथे उदयनराजेंशी त्यांची दहा मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर उदयनराजे यांनी ना. गिरीश बापट आणि अनिल डिग्गीकर यांची भेट घेतली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: