Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शबरीमाला : सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका
ऐक्य समूह
Tuesday, October 09, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) : केरळच्या प्रसिद्ध शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘राष्ट्रीय अय्यप्पा भक्त’ संघटनेच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विकृत नसला तरी अस्वीकारार्ह व अयोग्य असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी बोलावलेल्या बैठकीला न जाण्याचा निर्णय मंदिराच्या मुख्य पुजार्‍यांनी घेतला आहे. आधीच्या निकालाविरोधात आम्ही पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या निकालानंतर आम्ही पुढचा कार्यक्रम ठरवू. आता सरकारशी चर्चा करण्यात अर्थ नाही, असे शबरीमालाच्या कंदारारू मोहनारू यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शबरीमाला मंदिराच्या पंडलम या शाही कुटुंबानेही नाराजी व्यक्त केली होती. या मंदिराच्या प्राचीन परंपरा टिकल्या पाहिजेत, असे पंडलम शाही कुटुंबाचे प्रवक्ते आर. आर. वर्मा यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी कशी करावी, याची चर्चा करण्यात आपल्याला रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंदिराची ऐतिहासिक परंपरा जतन करावी, अशी अय्यप्पा भक्तांची मागणी असून त्यासाठी निदर्शनेही करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे सनातन धर्माच्या परंपरांचे पालन करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या या निदर्शनांमध्ये महिलांचा सहभागही मोठा होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून केरळमधील राजकारणही तापले आहे. या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल न केल्याबद्दल भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी डाव्या सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठवली आहे. तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने 4 विरुद्ध 1 अशा बहुमताने शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा निकाल दिला होता. या घटनापीठातील इंदू मल्होत्रा या एकमेव महिला न्यायमूर्तींनी बहुमताच्या निकालाच्या विरोधात आपला निकाल दिला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: