Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रुपया, शेअर बाजार कोसळला
ऐक्य समूह
Thursday, October 04, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: na1
गुंतवणूकदारांना पावणेदोन लाख कोटींना दणका
5नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) : कच्च्या तेलांच्या किमतीत झालेली वाढ, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची 73.34 अशी झालेली जबरदस्त घसरण आणि अन्य घटकांचा फटका शेअर बाजाराला आज पुन्हा बसला. सेन्सेक्समध्ये 550 अंकांची घसरण झाली तर निफ्टीही 11 हजार अंकांच्या खाली गेला होता. सेन्सेक्सने जुलैनंतर प्रथमच 36 हजार अंकांपेक्षा खालची पातळी गाठली. आजच्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांना एकाच दिवसात तब्बल 1.79 लाख कोटी रुपयांचा दणका बसला. शेअर बाजाराच्या यादीतील कंपन्यांचे 145 लाख कोटी रुपये पाण्यात गेले.
आज शेअर बाजार बंद होईपर्यंत चढउतार पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 550 अंकांच्या घसरणीसह 35,975 अंकांवर बंद झाला. निफ्टीतही 150 अंकांची घसरण होऊन तो 10,858 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स जुलैनंतर प्रथमच 36 हजार अंकांच्या खाली घसरला. सेन्सेक्समधील घसरणीचा सर्वाधिक फटका महिंद्रा अँड महिंद्राला बसला. महिंद्राचे समभाग 6.80 टक्क्यांनी पडले. अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांमुळे आणि पेट्रोलियम पदार्थ उत्पादक देशांच्या संघटनेच्या (ओपेक) भूमिकेमुळे कच्च्या तेलांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाची आज 73.34 या नव्या नीचांकी पातळीवर घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याने बाजारात जोरदार पडझड झाली. त्यात गुंतवणूकदारांचे 1.79 लाख कोटी रुपये पाण्यात गेले. आजच्या घसरणीमुळे एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयटीसी, विप्रो, एनपीटीसी, सन फार्मा, रिलायन्स, एशियन पेंट, भारती एअरटेल, कोटक बँक, मारुती, अ‍ॅक्सिक बँक, टीसीएस यांच्या समभागांचे मोठे नुकसान झाले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: