Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
धार्मिक विधीच्या जेवणानंतर चौदा जणांना विषबाधा
ऐक्य समूह
Wednesday, September 12, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 11 : धार्मिक विधीसाठी बनवलेले जेवण खाल्ल्यानंतर मंगळवारी दुपारी  चौदा जणांना (सर्व रा. निसराळे, ता.सातारा) पोटदुखी, उलट्यांचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी  क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांना अन्नातूनच विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोरगाव पोलिसांच्या पथकाने  निसराळे येथे भेट देत अन्नाचे नमुने ताब्यात घेतले आहेत.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, निसराळे येथे मंगळवारी सकाळी एका कुटुंबात धार्मिक विधीचा कार्यक्रम होता. या विधीसाठी येणार्‍या नातेवाइकांसाठी एकत्रित स्वयंपाक करण्यात आला होता. जेवण तयार झाल्यानंतर दुपारी नंतर जेवणाच्या पंगती बसण्यास सुरुवात झाली. जेवण झाल्यानंतर काही वेळाने मात्र एक-दोघांना पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरू झाला. पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होणार्‍यांच्या संख्येत वाढ होवू लागला. धार्मिक विधीसाठी आलेल्यांनी जेवण खाल्ल्यानंतर उलट्या व जुलाबाचा त्रास थांबत नसल्याने प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तरीही प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने अखेर त्या सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेखा घोरपडे, स्वप्नाली घोलप, सुप्रिया गायकवाड, लीलावती गायकवाड, सुरेखा गायकवाड, अमृता गायकवाड, तृप्ती गायकवाड, रूपाली गायकवाड, रेखा गायकवाड, उज्वला गायकवाड, लीलाबाई भोसले रसिका गायकवाड, मनीषा घोरपडे, रंजना रणदिवे या चौदा जणांवर उपचार सुरू आहेत. या सर्वांना अन्नातून विषबाधा झाली असून त्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: