Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
घरफोडीच्या गुन्ह्यात महिलेसह सराफालाही अटक
ऐक्य समूह
Saturday, September 08, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: lo1
मोठ्या सराफाला अटकेची पहिल्यांदाच कारवाई
5सातारा, दि. 7 :  सातार्‍यात घरफोडीतील सोने विकणार्‍या संशयित महिलेस आणि सोने खरेदी करणार्‍या सराफ असोसिएशनचा अध्यक्ष मोतीलाल जैन याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली असून दोघांना दि. 9 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चोरीचे सोने विकत घेणार्‍या मोठ्या सराफाला अटक करण्याची घटना घडली आहे. त्यामुळे सोनार व्यावसायिकांमध्येखळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 3 सप्टेबर रोजी बुधवार पेठ येथून तक्रारदार शकील बन्ने यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 62 हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरुन नेला होता. या घटनेचा शाहूपुरी पोलीस कसून तपास करत होते. त्यावेळी अल्पवयीन दोन शाळकरी मुलांनी सोन्याचे दागिने चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असता त्यांच्या दप्तरामध्येच चोरीचे थोडे दागिने मिळाले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर चोरीची कबुली देवून उर्वरीत दागिने सुरेखा सुभाष पवार (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) हिच्याकडे असल्याचे सांगितले. शाहूपुरी पोलिसांनी महिलेला ताब्यात घेवून चौकशी केली असता तिनेही चोरीची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही मुले व महिलेकडून दागिने जप्त केल्यानंतर त्यामध्ये आणखी दागिने कमी असल्याचे  समोर आले. त्याबाबत माहिती विचारल्यानंतर गुलाबजी हिंदुजी ज्वेलर्स दुकानाचे मालक मोतीलाल जेठमल जैन (रा. शनिवार पेठ, सातारा) याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार ज्वेलर्स दुकानदार मोतीलाल जैन याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने महिलेकडून दागिने घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी ज्वेलर्स दुकानदाराला अटक केली. संशयित महिला व ज्वेलर्स दुकानदाराला जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोनि. चंद्रकांत बेदरे, सपोनि. विठ्ठल शेलार, फौजदार सागर गवसणे, पोलीस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, वैभव सावंत, मयूर देशमुख, संकेत माने, मारुती अडागळे, गणेश कचरे, प्रवीण गोरे, लैलेश फडतरे, संतोष लेंभे, श्रीनिवास देशमुख, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, धीरज बेचके, प्रीती माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: