Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ग्रामीण भागातील गुणवत्ता शिक्षकांनी ओळखावी : ना. रामराजे
ऐक्य समूह
Friday, September 07, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 6 : ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता आहे. ती ओळखण्याचे काम शिक्षकांचे आहे. शिक्षकी पेशा हा समाज घडवणारा पेशा आहे. हा पेशा सामाजिक सेवा म्हणूनच हा पेशा स्वीकारला पाहिजे, अशी अपेक्षा विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. रामराजे म्हणाले, शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण द्यायचे म्हटले तरी सरकारी खर्चाला मर्यादा येतात. माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, ग्रामस्थ यांनी जर मदत केली तर आपल्या ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा निश्‍चित सुधारेल. निधीसाठी सरकारवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. ग्रामीण भागातील शिक्षणाबाबत अनेक अडचणी आहेत. शाळांच्या इमारती, मुले त्याच इमारतीत शिकतात, गावातील पालक चिंतेत असतात. दोन अडीचशे शाळांची गरज आहे. इमारत दुरुस्तीसाठी अनंत अडचणी येत असतात. रयत संस्थेवर मी आहे. ते पाहतो. तेथेही पैशाची अडचण असते. खर्च परवडत नाही. त्यासाठी तिथल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून शाळेसाठी मदतीचा हात उभा केला. असाच उपक्रम जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत उभा राहिला तर सरकारवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. सरकार कोणाचे का असेना, खर्चावर मर्यादा येतात. 60 वर्षांत आम्ही हे पाहतो. सरकारी खर्चाचे बाजूला ठेवूया. प्रत्येकाने थोडी थोडी काटकसर करुन शाळेसाठी मदतीचा हातभार केल्यास निश्‍चित शाळा चांगल्या होतील. दोन महिन्यापूर्वी बिकट परिस्थिती होती. शिक्षकांच्या आयुष्यात बदली हा मुद्दा असतो. सरकारी घटक असल्यामुळे मी टीका करणार नाही. परंतु बदल्या या होणारच. त्यावर उपाय करणे हे सरकारचे काम आहे.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात आजपर्यंत ज्या ज्या स्पर्धा झाल्या आहेत. त्या स्पर्धांमध्ये सातारा जिल्हा अग्रेसर राहिला आहे. ते कोणा एकट्याचे काम नसते, ते टीमवर्क असते. सुंदर शाळा, डिजिटल शाळा याप्रमाणे शाळांमध्ये बदल होवू लागले आहेत. परंतु ज्याप्रमाणे विद्यार्थी तयार व्हायला पाहिजे त्याप्रमाणे होताना दिसत नाही. एकाएका गावात चार चार शिक्षक असतील तर एक शिक्षक बँकेत, एक शिक्षक जिल्ह्याच्या ठिकाणी, एक शाळेवर, एक रजेवर अशी परिस्थिती आहे. शाळेची विद्युत बिले व्यावसायिक पध्दतीने का लावली याचे कोडे अजूनही उलगडले नाही.     
 विधानसभेत या मुद्यावर आम्ही भांडलो. सातारा जिल्ह्यात 1 हजार शिक्षक कमी आहेत. 1133 शाळांच्या इमारतींची दुरुस्ती नाही. आज शिक्षकांना शाळेत निघण्यापूर्वी भीती वाटते की आदेश कधी निघेल हे सांगता येत नाही. आतापर्यंत 100 हून आदेश निघाले असतील. सीईओ साहेबांनी त्यावर तर पीएचडीच करावी. त्यामुळे नक्की कोण कारभार पाहतेय तेच कळत नाही. ग्रामविकास खाते की शिक्षण खाते काम करतेय हेच समजत नाही. बदल्यांच्या काळात शिक्षकांच्या अडचणी बर्‍याच वाढल्या होत्या. उद्या 50 ते 60 बदल्या आहेत. त्या तरी चांगल्या करा. रामाचे राज्य असू द्या, रावणाचे नसू द्या. रामराजेसाहेब तुम्हीच एक चांगला आदेश काढा की महाराष्ट्रातील शिक्षकांना मानसन्मान मिळाला पाहिजेे. 
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आदर्श शिक्षक पुरस्कार्थी शिवाजी शिंगाडे, रामचंद्र सपकाळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  शिक्षण सभापती राजेश पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मधु कांबळे, सातारा पंचायत समितीच्या सदस्या सरिता इंदलकर, कांचन कांळगे,  पाटणचे उपसभापती राजाभाऊ शेलार, खटावच्या सभापती कल्पना मोरे, जावलीच्या सभापती अरुणा शिर्के, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
 पुरस्कार विजेते
जिल्हा परिषद शाळा जकातवाडीचे दत्तात्रय बागल, अंबवडे संमत वाघोलीचे सचिन क्षीरसागर, निमसोड शाळा नंबर 1 चे चंद्रकांत मोरे, वगरेवस्ती शाळेचे शिवाजी शिंगाडे, कोर्‍हाळे शाळेचे संजय बोबडे, मळाईवस्ती शाळेचे यशवंत पवार, खावली शाळेचे महेंद्र जगताप, रानगेघर शाळेचे संजय गोळे, पांगारी शाळेच्या कमल आमराळे, मरळोशी शाळेचे रामचंद्र सपकाळ, किवळ शाळेचे आनंदराव
शेलार, आगाशिवानगर शाळेच्या श्रीमती वैशाली भोसले
आणि विशेष पुरस्कार शेंडेवाडी शाळेच्या सुजाता हारुगडे यांना सन्मानित करण्यात आले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: