Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नगरसेविकेचा मुलगा, कोंडव्याच्या उपसरपंचासह आठ जण तडीपार
ऐक्य समूह
Friday, September 07, 2018 AT 10:41 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 6 : सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मारामारी, खुनाचा प्रयत्न करणार्‍या तीन टोळीतील आठ जणांना जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तडीपार केले. तडीपारीच्या कारवाईमुळे भल्याभल्यांचे धाबे दणाणले आहेत. तडीपार झालेल्यांमध्ये नगरसेविकेच्या मुलाचा आणि उपसरपंचाचा समावेश आहे.
तडीपार झालेल्यांची अमर श्रीरंग आवळे (वय 32, रा. बुधवार नाका), सुजित उर्फ गण्या सदाशिव आवळे (वय 27, रा. बुधवार नाका, सातारा) अमिर फारुख शेख (वय 29, रा. मलकापूर), लाजम अल्लाउद्दीन होडेकर (वय 35, रा. गोटे), समीर ईस्माईल मुजावर (वय 28, रा. आगाशिवनगर सर्व ता. कराड), गणेश शंकर निंबाळकर (वय 32), योगेश किसन निंबाळकर (वय 29), आदिनाथ यसाजी निंबाळकर (वय 35, सर्व रा.कोंडवे, ता. सातारा) अशी नावे आहेत. यातील अमर आवळे याची आई सातारा नगरपालिकेत नगरसेविका असून सध्या सभापतिपदावर आहेत. याशिवाय गणेश निंबाळकर हा कोंडवे गावचा विद्यमान उपसरपंच असल्याची माहिती समोर आली आहेे.
याबाबत अधिक माहिती अशी, नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तडीपार कारवाईचा धडका सुरुच ठेवला आहे. त्यांनी पद्भार स्वीकारल्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील ही तडीपारीची कारवाई आहे. संशयित तिन्ही टोळ्यांवर  विविध गंभीर गुन्हे दाखल आहेेत. यातील अमर आवळे, गणेश निंबाळकर व अमिर शेख टोळ्यांचे प्रमुख आहेेत. संबंधितांविरुध्द शाहूपुरी, सातारा तालुका व कराड शहर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही टोळीतील सदस्यांना पोलिसांनी सुधारण्याची संधी दिली होती. मात्र संशयितांमध्ये सुधारणा होत नव्हती. सर्वसामान्य जनतेला त्यांचा त्रास होत होत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत होती. यामुळे संबंधितांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करुन ते पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठवण्यात आले. त्यावर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या प्राधिकरणापुढे सुनावणी झाली. गुरुवारी संबंधितांना सातारा जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश त्यांनी दिले.  कारवाई झाल्यानंतर 48 तासांच्या आत त्यांना सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात येणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: