Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सराईत चोरट्याच्या मुसक्या म’श्‍वर पोलिसांनी आवळल्या
ऐक्य समूह
Friday, September 07, 2018 AT 10:42 AM (IST)
Tags: re1
5महाबळेश्‍वर, दि. 6 : महाबळेश्‍वरसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे तब्बल 23 गुन्हे दाखल असलेल्या गणेश विष्णूदास धनावडे (वय 22, रा. करंजे तर्फ मेढा, ता. जावली) या सराईत गुन्हेगाराला महाबळेश्‍वर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची सातारा कारागृहात रवानगी करण्यात आली.
याबाबत माहिती अशी, महाबळेेश्‍वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सौरऊर्जा बॅटरी चोरीच्या गुन्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून गणेश धनावडे हा फरारी होता. अनेक वेळा शोध घेऊनदेखील त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता. गणेश धनावडे हा सराईत गुन्हेगार शिरवळ येथील एका खासगी कंपनीत नाव व गाव बदलून काम करत असल्याची माहिती खबर्‍याकडून पोलिसांना मिळाली. सलग दोन दिवस पोलीस त्याचा शोध घेत होते.
गणेश हा मेढा येथे लपून राहत असल्याची माहिती मिळाल्यावर महाबळेश्‍वरचे सहाय्यक फौजदार डी. एच. पावरा व हवालदार चंद्रकांत तिटकारे यांनी त्याला घरातून उचलले. त्याच्यावर महाबळेश्‍वरसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे 23 गुन्हे दाखल आहेत. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याची सातारा कारागृहात रवानगी करण्यात आली.       
या कारवाईबद्दल सहाय्यक फौजदार पावरा व हवालदार तिटकारे यांची महाबळेश्‍वरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे बक्षिसासाठी (रिवॉर्ड) शिफारस केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: