Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हायकोर्टाने केली तपास यंत्रणांची कानउघाडणी
ऐक्य समूह
Friday, September 07, 2018 AT 10:39 AM (IST)
Tags: mn2
दाभोळकर, पानसरे कुटुंबीयांनाही फटकारले
5मुंबई/पुणे, दि. 6 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत या हत्येसंबंधी सतत माध्यमांसमोर येऊन माहिती उघड करणार्‍या तपास यंत्रणांची न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केली. या प्रकरणी माध्यमांसमोर येऊन वक्तव्ये करणार्‍या दाभोळकर व पानसरे कुटुंबीयांनाही न्यायालयाने फटकारले. दरम्यान, गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यांमधील मास्टर माईंड असलेल्या अमोल काळे याला पुणे न्यायालयाने 14 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
डॉ. दाभोळकर, कॉ. पानसरे हत्या प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने तपास यंत्रणांची चांगलीच कानउघाडणी केली. एटीएसच्या अधिकार्‍यांनी माध्यमांसमोर जाऊन वारंवार पुरावे उघड करणे आम्हाला पसंत नाही, अशा शब्दांत हायकोर्टाने त्यांना फटकारले. या हत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असताना विशेष तपास पथक (एसआयटी) सतत माध्यमांसमोर का जात आहे? हे योग्य नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले. इतर तपास यंत्रणांवर अवलंबून राहू नका. तुमचा स्वतंत्र तपास सुरू ठेवा, असे निर्देश कॉ. पानसरे यांच्या हत्येचा तपास करणार्‍या एसआयटीला उच्च  न्यायालयाने दिले. तपास यंत्रणांची कानउघाडणी करताना उच्च न्यायालयाने दाभोळकर-पानसरे कुटुंबीयांनाही खडसावले आहे. या दोन्ही कुटुंबीयांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गैरफायदा घेऊ नये. माध्यमांसमोर जावून वारंवार भाष्य करू नये. या प्रकरणाचे पुरावे उघड करू नयेत, अशी समजही त्यांना दिली. दाभोळकर हत्या प्रकरणाच्या सुनावणीला 10 ऑक्टोबरपर्यंत उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दरम्यान, गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी हत्या प्रकरणातील मास्टर माईंड अमोल काळेला आज पुणे न्यायालयाने 14 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज सीबीआयने एका बंद डायरीच्या माध्यमातून पुणे न्यायालयासमोर युक्तिवाद सादर केला. तपासात अडथळे निर्माण होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला न्यायालयात तोंडी युक्तिवाद न करण्याचे आदेश दिल्याने सीबीआयने आज बंद डायरीच्या माध्यमातून न्यायाधीश एस. ए. सय्यद यांच्यासमोर युक्तिवाद सादर केला आहे.
सीबीआयचे वकील विनयकुमार ढाकणे म्हणाले, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्यांमधील आरोपींना अमोल काळेने मदत केली. कट रचणे आणि शस्त्रे पुरवण्याचे काम त्याने केल्याने 14 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात यावी. त्यावर आरोपीचे वकील धर्मराज म्हणाले, सीबीआय आरोपीच्या कोठडीचा गैरवापर करत आहे. त्यामुळे त्याला 14 दिवसांची सीबीआय कोठडी देऊ नये. दरम्यान, एल्गार परिषदेतील आरोपी शोभा सेन आणि सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन अर्जावर 14 सप्टेंबरला सुनावणी करण्यात येणार आहे. याच प्रकरणातील आरोपी  सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोभा सेन व रोना विल्सन यांना येरवडा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव इतर कारागृहात हलवण्याच्या अर्जावरदेखील त्याच दिवशी सुनावणी होणार आहे. ‘एल्गार’ परिषद प्रकरणातील तपास अधिकारी आज न्यायालयात गैरहजर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: