Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पुरावे असल्यानेच ‘त्या’ कार्यकर्त्यांना अटक
ऐक्य समूह
Thursday, September 06, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: mn1
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पोलिसांचे प्रतिज्ञापत्र
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) : डाव्या चळवळीतील पाच कार्यकर्त्यांचे सरकारच्या विरोधात मत असल्याच्या कारणावरून नव्हे तर बंदी घातलेल्या सीपीआय-माओवाद्यांबरोबरच्या (नक्षलवादी) संबंधांचे जोरदार पुरावे असल्यानेच त्यांना अटक करण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र पोलिसांनी आज सर्वोच्च न्यायालयात सादर केले. भीमा-कोरेगाव हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या ‘एल्गार’ परिषदेशी संबंधित हे कार्यकर्ते असून त्यांना देशात अराजकता माजवायची होती. त्यासाठी त्यांनी कट आखल्याचेही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या सर्वांची चौकशी करता यावी यासाठी त्यांना नजरकैदेतून पोलिसांच्या ताब्यात देण्याची विनंती या प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे.
इतिहासकार रोमिला थापर, अर्थतज्ज्ञ प्रभात पटनाईक, देवकी जैन आणि प्रा. सतीश देशपांडे यांनी या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना नोटीस पाठवली होती. या याचिकेत डाव्या चळवळीतील या पाच कार्यकर्त्यांच्या अटकेला आव्हान देण्यात आले असून याबाबत महाराष्ट्र पोलिसांनी आज प्रतिज्ञापत्र सादर केले. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाशी याचिकाकर्त्यांचा कोणताही संबंध नसताना त्यांना याचिका करण्याचा अधिकारच नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. नजरकैदेत असलेले सर्व संशयित देशात हिंसाचार पसरवणे आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची योजना आखत होते, असा आरोप पोलिसांनी केला आहे.
या कार्यकर्त्यांचे सरकारशी मतभेद असल्याच्या कारणावरून नव्हे तर त्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्यानेच अटक करण्यात आली होती. याबाबतचे पुरेसे पुरावे असल्यानेच त्यांना अटक करण्यात आली, असे महाराष्ट्र पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. पोलिसांनी न्यायालयात सीलबंद लिफाफ्यात पुरावेदेखील सादर केले आहेत. नजरकैदेत असल्याने या संशयितांच्या हालचालींवर मर्यादा आली असली तरी ते घरी बसून पुरावे नष्ट करू शकतात. इतर संंशयितांना सावध करू शकतात, असा संशय पोलिसांनी व्यक्त केली आहे. नजरकैदेत असतानाही हे आरोपी देशात अराजकता पसरवण्याचे काम करू शकतात. त्यामुळे त्यांना नजरकैदेत न ठेवता पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणीही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात केली आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी डाव्या चळवळीतील कार्यकर्त्या व वकील सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, तेलुगू कवी वरवरा राव आणि व्हर्नन गोन्साल्विस यांना अटक केली होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करताना पोलिसांना फटकारले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने या कार्यकर्त्यांना अटक करण्याऐवजी त्यांच्या घरांमध्ये नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.  लोकशाहीत मतभिन्नता सेफ्टी व्हॉल्वसारखी असून ती नसल्यास प्रेशर कुकर फुटेल, असे मतही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते. 
या प्रकरणी आता पुढील सुनावणी उद्या, दि. 6 रोजी होणार आहे.
दरम्यान, या संशयितांकडे संगणक, लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, मेमरी कार्ड व अन्य इलेक्ट्रॉनिक साधने सापडली असून त्यांच्यामध्ये ई-मेलद्वारे झालेल्या पत्रव्यवहाराचा तपशील मिळाला आहे. या पत्रव्यवहारातील सांकेतिक भाषा उलगडण्यात यश आले आहे. ते देशात अराजकता पसरवण्याच्या प्रयत्नात सहभागी असल्याचे या सामग्रीच्या आधारे म्हणता येते, असेही पोलिसांनी सर्वोच्च न्यायालायाला सांगितले. या पाच संशयितांनी आपल्या कार्यकर्त्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात भूमिगत होण्याचे आदेश दिल्याचे सापडलेल्या पुराव्यांद्वारे स्पष्ट होत आहे. या संशयितांनी आपल्या कार्यकर्त्यांना हत्यारे खरेदीसाठी पैसा गोळा करणे आणि देशात तस्करीतून हत्यारे खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: