Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचा विनोद तावडेंना घेराव
ऐक्य समूह
Thursday, September 06, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: lo1
आक्षेपार्ह विधानावर तीव्र प्रतिक्रिया ; राम कदमांचा पुतळा जाळला, काँग्रेसने जोडे मारले
5सातारा, दि. 5 : दहीहंडी-मध्ये मुलींबाबत भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा फटका शालेय शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांना बसला. मंत्री तावडे यांना  घेराव घालून राम कदमांच्या राजीनाम्याची  मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा  चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला पदाधिकार्‍यांनी आमदार राम कदम यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून त्याला जोडे मारले. काँग्रेसच्या महिला आघाडीनेही राम कदम यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले.
भाजपचे आमदार राम कदम यांच्या घाटकोपर  मतदारसंघातील दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. कार्यक्रमास चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीने हजेरी लावली होती. तिला पाहणसाठी हजारोंची गर्दी कार्यक्रमस्थळी झाली होती. त्यामुळे आमदार कदम भलतेच चेकाळले होते. आपण काय बोलतोय  याचे भान त्यांना राहिले नाही. त्यातच त्यांनी मुलींबाबत अतिशय खालच्या पातळीवर येवून मुक्ताफळे उधळली. त्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली. विरोधक त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत.  राम कदम हे भाजपचे आमदार असल्याने राष्ट्रवादीने भाजपच्या सर्वच नेत्यांना टार्गेट केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी  काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सातारा दौर्‍यावर असलेल्या शालेय  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना येथील शासकीय विश्रामगृहावर घेराव घालून प्रचंड घोषणाबाजी करत आमदार कदम यांच्या हकालपट्टीची मागणी केली. जो माणूस महिलांचा सन्मान करू शकत नाही, अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत. अशा प्रवृत्तींना भाजप सरकार पाठीशी घालत आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजपच्या पाठिंब्यामुळे अशा लोकांचे मनोधैर्य वाढत आहे.  यापुढे  अशा प्रवृत्तींना सरळ करण्यासाठी प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा चित्रा वाघ यांनी तावडे यांना दिला. घटनास्थळी भाजपचे पदाधिकारी हजर होते. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
येथील राष्ट्रवादी भवनासमोर चित्रा वाघ यांचा नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी आ. कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोड्याने झोडपले तसेच पुतळ्याचे दहन केले. यावेळी भाजप सरकार व आमदार कदम यांच्याविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महाविद्यालीन तरुणींचा सहभाग लक्षणीय होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: