Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पोवई नाक्यावरील पेट्रोल पंपाचा कट्टा पालिकेने हटवला
ऐक्य समूह
Thursday, September 06, 2018 AT 11:14 AM (IST)
Tags: lo3
वाहतूक सुरळीत होण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
5सातारा, दि. 5 : ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवई नाक्यावरील वाहतूक कोंडीने तीव्र स्वरूप धारण केले आहे. वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी पोवई नाका येथे वाहतुकीस अडथळा ठरणारा जुन्या कालिदास पेट्रोल पंपाचा  कट्टा सातारा पालिकेतर्फे बुधवारी हटवण्यात आला. तीन वर्षांपूर्वी हा पंप तेथून हटविण्यात आला आहे. मात्र कट्ट्याने जागा अडवून धरली होती.  ही समस्या पालिकेने दूर केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जेसीबीने पूर्वीच्या पेट्रोलपंपाचा कट्टा हटवला आणि  रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेतली. या जागेवर तात्पुरता मुरूम टाकून रुंदीकरण करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता रुंदीकरणामध्ये अडथळा ठरत असल्याने तीन वर्षांपूर्वी या पंपाचे बांधकाम पाडले होते. त्या दिवसापासून पंप बंद आहे. मात्र त्याच्या दारातील कट्टा तसाच होता. त्यामुळे रहदारीसाठी ही जागा वापरात येत नव्हती. ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शिवाजी सर्कल ते पोलीस कवायत मैदान हा रस्ता, कालिदास पंपाजवळ अधिकच अरुंद झाला आहे. त्यामुळे कट्टा पाडून रुंदीकरण करणे गरजेचे होते. गेल्या आठवड्यात जागा ताब्यात घेण्यासाठी पोवई नाक्यावर गेलेले पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कालिदास पंपाच्या जागेवर जाऊन थबकले होते. दिवसभराच्या प्रतीक्षेनंतर कर्मचार्‍यांना हात हलवत परत यावे लागले होते. मात्र बुधवारी  या पथकाने चर्चेअंती जागा ताब्यात घेतली. जेसीबीच्या सहाय्याने कट्टा हटवण्यात आला. या ठिकाणी सध्याचा रस्ता सहा मीटर रुंदीचा असून रुंदीकरणानंतर तो 20 मीटर रुंद होईल,असे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. कारवाईमध्ये भाग निरीक्षक सतीश साखरे, अतिक्रमण विभाग निरीक्षक प्रशांत निकम व शैलेश अष्टेकर यांनी भाग घेतला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: