Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पोलिसांवर कारवाईची मागणी
ऐक्य समूह
Wednesday, September 05, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: mn2
भीमा-कोरेगाव हिंसाचार : हायकोर्टात याचिका
5मुंबई, दि. 4 (वृत्तसंस्था) : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन ‘एल्गार’ परिषदेच्या आयोजकांवर जाहीर आरोप केल्याबद्दल आणि अटक केलेल्या पाच संशयितांशी संबंधित पुरावे असलेली पत्रे जाहीरपणे वाचून दाखवल्याबद्दल राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमवीर सिंग आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेचा साक्षीदार असल्याचा दावा करणार्‍या संजय भालेराव या डाव्या चळवळीतील कार्यकर्त्याने ही याचिका दाखल केली आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचाराशी ‘एल्गार’ परिषदेचे आयोजक संबंधित असल्याचा संशय व्यक्त करत पुणे पोलिसांनी नुकतीच डाव्या चळवळीतील पाच कार्यकर्त्यांना अटक केली होती. या सर्वांचे नक्षलवाद्यांशी संबंध असून सरकार उलथवून टाकून देशात आणि राज्यात हिंसाचार घडवण्याचा त्यांचा कट होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे. या संदर्भात अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमवीर सिंग आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकार्‍यांनी 31 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली होती. डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये ई-मेल व अन्य इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे झालेल्या पत्रव्यवहारातील काही पत्रे पोलीस अधिकार्‍यांनी या पत्रकार परिषदेत पुराव्यादाखल वाचून दाखवली होती. त्यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.
अशा प्रकारे पुरावे जाहीर करून परमवीर सिंग व त्यांच्या सहकार्‍यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे. पोलिसांनी 19 मार्च रोजी  पुणे येथील मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर अर्ज करून भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आणखी काही लोकांची झडती घेण्याची मागणी केली होती. या अर्जावर ‘इन कॅमेरा’ (बंद कक्षात) सुनावणी घ्यावी, अशी मागणीही पोलिसांनी केली होती. या सुनावणीत संबंधितांची नावे उघड झाल्यास ते पुरावे नष्ट करण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांचा अर्ज मान्य केला होता. मात्र, आता संबंधितांवर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन संवेदनशील पुरावे उघड केले आहेत. पोलीस अधिकार्‍यांच्या या गैरवर्तनाबद्दल घटनेतील परिशिष्ट 311 अन्वये त्यांच्यावर बरखास्तीची कारवाई करण्यासंदर्भात आदेश द्यावेत, अशी मागणी भालेराव यांनी केली आहे. या याचिकेवर 7 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: