Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही प्रशासनाने घेतली फेरनिवडणूक
ऐक्य समूह
Wednesday, September 05, 2018 AT 11:33 AM (IST)
Tags: re2
बेलावडेचे सरपंच पात्र ठरल्याने प्रशासनापुढे पेच
सूर्यकांत जोशी
5कुडाळ, दि. 4 : बेलावडे, ता. जावली येथील सरपंच श्रीकृष्ण शिंदे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र ठरवण्याचा अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांनी दिलेला निर्णय अप्पर आयुक्त यांनी रद्दबातल ठरविला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच श्रीकृष्ण शिंदे यांच्या जागेवर ग्रामपंचायत सदस्यत्वाची फेर निवडणूक घेण्याचा प्रताप जावलीच्या तहसीलदार कार्यालयाने केला. त्यामुळे त्या ठिकाणी अन्य सदस्य निवडून आला आहे तर अप्पर आयुक्तांनी आपले ग्रामपंचायत सदस्यत्व पात्र ठरवल्याने आपले अधिकार आपणास प्राप्त व्हावेत, अशी मागणी श्रीकृष्ण शिंदे यांनी केल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
याबाबत श्रीकृष्ण शिंदे यांनी दिलेली माहिती अशी, बेलावडे, ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक 2015 मध्ये झाली. या निवडणुकीत श्रीकृष्ण शिंदे व त्यांचे पॅनेल निवडून आले. त्यामुळे बहुमताने श्रीकृष्ण शिंदे सरपंच झाले. त्यानंतर त्यांचे राजकीय विरोधक नितीन रामचंद्र शिंदे यांनी श्रीकृष्ण शिंदे हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत असल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र करण्यात यावे, याबाबत अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांच्या न्यायालयात अपिल दाखल केले होते. 
अप्पर जिल्हाधिकारी यांनी श्रीकृष्ण शिंदे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर या आदेशाच्या विरोधात संबंधित सदस्यांनी अप्पर आयुक्त पुणे यांच्याकडे अपिल दाखल केले. याबाबत खातरजमा करुन घेऊनच सदर रिक्त सदस्यपदाची निवडणूक घ्यावी असे आदेश तहसीलदार जावली यांना दिले होते. तसेच श्रीकृष्ण शिंदे यांनी ही आपण अप्पर जिल्हाधिकारी यांच्या निर्णया विरोधात अप्पर आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केल्याबाबत जिल्हाधिकारी सातारा, तहसीलदार जावली, गटविकास अधिकारी जावली व ग्रामसेवक बेलावडे यांना लेखी कळवून पोहोच घेतली आहे. असे असतानाही जावलीच्या तहसीलदारांनी सदर रिक्तपदासाठी निवडणूक घेतल्याने त्या जागी अन्य सदस्य निवडून आला. दरम्यान श्रीकृष्ण शिंदे यांचे अपील अप्पर आयुक्त पुणे यांनी मान्य केले. व त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व पात्र ठरविले. त्यामुळे श्रीकृष्ण शिंदे यांनी दि. 19 जुलै रोजी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे आपले ग्रामपंचायत सदस्यत्वाचे हक्क मिळण्याची लेखी मागणी केली आहे. परंतु याबाबत आपणास अद्याप न्याय मिळाला नाही. एकाच जागेवर दोन लोक नियुक्त सदस्य झाल्याने प्रशासनापुढे आता पेच निर्माण झाला आहे. दरम्यान या सर्व प्रकरणात आपली नाहक मानहानी झाली आहे. तसेच मानसिक त्रास होऊन आर्थिक नुकसान झाले असल्याने आपण संबंधितांविरोधात मानहानी व नुकसान भरपाईचा दावा दाखल करणार आहे, असे श्रीकृष्ण शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याबाबत जावलीच्या तहसीलदार सौ. रोहिणी आखाडे यांच्याकडे विचारणा केली असता त्या म्हणाल्या, ग्रामपंचायत अधिनियमानुसार सदस्यत्वाचे पद सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रिक्त ठेवता येत नाही. श्रीकृष्ण शिंदे यांचे सदस्यत्व अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने 2016 मध्ये अपात्र ठरविले होते. या निर्णयाला अप्पर आयुक्त पुणे यांनी स्थगिती दिली नव्हती. 2016 मध्ये संबंधित शिंदे यांनी आपण अप्पर आयुक्त पुणे यांच्या न्यायालयात अपील दाखल केले असल्याबाबत प्रशासनाला कळविल्याचे सांगत आहेत. फेब्रुवारी 2016 पासून दोन वर्षे हे पद रिक्त होते. या दोन वर्षात सदर केसबाबत काय निर्णय झाला याबाबत तालुका प्रशासन अनभिज्ञ होते. हे पद अधिक काळ रिक्त असल्याने या सदस्यपदाची निवडणूक फेब्रुवारी 2018 मध्ये लावण्यात आली. त्यावेळी श्रीकृष्ण शिंदे यांनी सदर निवडणूक प्रक्रियेवर कोणताही आक्षेप घेतला नाही किंवा प्रशासनाला अपिल दाखल असल्याचे निदर्शनास आणून दिले नाही. उलट या निवडणुकीत त्यांनी स्वतःच्या पत्नीला निवडणूक उमेदवारी दिली. परंतु तदनंतर अप्पर आयुक्त यांच्या न्यायालयाने श्रीकृष्ण शिंदे यांचे अपिल मान्य केले. या निर्णयमुळे शिंदे यांचे सदस्यत्व पात्र ठरत असल्याने त्यांनी आपले अधिकार पूर्ववत प्राप्त होण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे मागणी केली आहे. या निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय मागवला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे तहसीलदार आखाडे यांनी दै. ऐक्यशी बोलताना सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: