Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘सकल मराठा महिला क्रांती मोर्चा’ची स्थापना
ऐक्य समूह
Wednesday, September 05, 2018 AT 11:32 AM (IST)
Tags: mn4
5पुणे, दि. 4 (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र, या समितीत महिलांना स्थान मिळाले नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चातील महिलांनी संघटनेच्या कार्यपद्धतीचा निषेध केला असून ‘सकल मराठा महिला क्रांती मोर्चा’ या नावाने स्वतंत्र राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्याची घोषणा मंगळवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या काही महिलांनी मात्र विरोध केला. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चामध्ये फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मागील दोन वर्षात तब्बल 58 मूक मोर्चे काढण्यात आले.
या दरम्यान अनेक वेळा समन्वयकांच्या बैठकादेखील झाल्या. पुण्यात 1 सप्टेंबर रोजी बैठक घेऊन त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन केल्याची घोषणा करण्यात आली होती. त्या बैठकीला महिलांना बोलावले नाही आणि समन्वय समितीत महिलांना स्थान दिले नाही म्हणून पुण्यातील काही महिलांनी ‘सकल मराठा महिला क्रांती मोर्चा’ची राज्याची समिती स्थापन केली आहे. या समितीची घोषणा करण्यासाठी पुण्यात आज पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषद सुरू झाल्यावर मराठा क्रांती मूक मोर्चातील काही महिला त्या ठिकाणी आल्या आणि महिलांच्या या स्वतंत्र समितीस त्यांनी विरोध दर्शविला.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी तुमचे या विषयी बोलणे झाले आहे का, असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या विद्यार्थिनी समन्वयक पूजा झोळे यांनी उपस्थित केला. त्याला महिला क्रांती समितीच्या उषा पाटील यांनी उत्तर दिले. आजवर अनेक मोर्चांमध्ये आपण महिला सहभागी झालो. मात्र, अनेक बैठकांमध्ये महिलांना डावलण्याचा प्रकार घडला. असाच प्रकार 1 सप्टेंबरच्याही बैठकीत घडल्याने अखेर ‘सकल मराठा महिला क्रांती मोर्चा’च्या स्वतंत्र समितीची स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता महिलांची भूमिका मांडण्यासाठी 7 तारखेला राज्यस्तरीय पत्रकार परिषद पुण्यात आयोजित केली आहे. त्यावेळी महिलांची संख्या यांना समजेल, अशा शब्दात उषा पाटील यांनी भूमिका मांडली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: