Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प्रतापगंज पेठेतील जुनी इमारत मालकाच्या हलगर्जीपणामुळे कोसळली
ऐक्य समूह
Monday, September 03, 2018 AT 11:29 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 2 :  येथील प्रतापगंज पेठेत गोराराम मंदिरामधील एक जुनी इमारत ट्रस्टच्यावतीने (मालक प्रसाद आगटे) यांच्या दुर्लक्षित व हलगर्जीपणामुळे अखेर रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. भिंत कोसळल्याने जुन्या इमारतीत राहणारे भाडेकरु महेंद्र शिवाजीराव सुळके यांचे सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
 याबाबतची अधिक माहिती, 1984-85 मध्ये गोराराम मंदिर ट्रस्टच्या जागेत करारानुसार शिवाजीराव सुळके यांनी सुमारे 2 लाख 62 हजार रुपये खर्च करुन घर बांधकाम केले होते. त्या मोबदल्यात पुढील 35 वर्षे भाडे वजा करुन त्या जागेत कायमस्वरुपी राहण्याचा हक्क ट्रस्टने शिवाजीराव सुळके यांना दिला होता. ट्रस्टच्या जागेत घराच्या मागील बाजूस शेख यांना नवीन बांधकाम करण्याकरता ट्रस्टने अधिकार दिलेला होता. मात्र या बांधकामामुळे महेंद्र शिवाजीराव सुळके भाड्याने राहत असलेल्या इमारतीस धोका निर्माणझालेला होता, त्यामुळे सुळके यांनी तसे जागा मालकाला कळवले होते. जुन्या इमारतीत भाडेकरु म्हणून राहणार्‍या महेंद्र शिवाजीराव सुळके यांनी बेकायदेशीर बांधकाम करु नका. तुम्ही करत असलेल्या बांधकामामुळे जुन्या इमारतीला धोका पोहचू शकतो आणि इमारतीची भिंत अथवा इमारत पडू शकते, असे ट्रस्टला कळवले होते.
मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन सन 2013 मध्ये शेख यांना नवीन बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर काही वर्षांनी प्रसाद आगटे यांनी शेख यांच्यावर दावा दाखल केला. वेगवेगळ्या प्रकारे भाडेकरु आणि इतरांनाही आगटे हे सातत्याने त्रास देत असतात, असा अनुभव तेथे राहणारे नागरिक सांगतात. नवीन बांधकाम करताना सुळके यांनी नवीन बांधकामामुळे जुन्या इमारतीला धोका होवू शकतो, असे ट्रस्टच्या निदर्शनास आणून दिले होते आणि ट्रस्टला जुन्या इमारतीची दुरुस्ती करुन द्या किंवा आम्ही स्वखर्चाने दुरुस्ती करतो त्यासाठी परवानगी द्या, असेही सुळके यांनी कळवले होते. मात्र दुरुस्तीसाठीची परवानगी ट्रस्टच्यावतीने प्रसाद आगटे यांनी नाकारली व मालक म्हणून दुरुस्तीही करु न दिल्याने इमारत कोसळली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: