Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाठार निंबाळकर येथे कंपनी आगीत खाक, 13 कोटींचे नुकसान
ऐक्य समूह
Saturday, September 01, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: re4
5फलटण, दि. 31 : वाठार निंबाळकर, ता. फलटण येथील आयुर ट्रेडर्सला शुक्रवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत कंपनीचा फलटण-पुसेगाव रस्त्याच्या पूर्वेकडील संपूर्ण भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने तेथे असलेले जळाऊ लाकूड, अन्य साहित्य व 7 वाहने जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेत 13 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अग्निशमन विभागाकडून अथवा महावितरणच्या अधिकार्‍यांच्या अहवालानंतरच कळणार असल्याचे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले आहे. तथापि, या बाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे. ही आग कंपनीच्या जागेतून गेलेल्या महावितरणच्या वीजवाहक तारांमधील घर्षणामुळे लागली की अन्य कारणाने हे पोलीस तपासातून उघड होईल. मात्र ही आग जवळपास दहा एकर परिसरात लागली आहे. अद्याप आगीचे लोट त्या ठिकाणी दिसत आहेत. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात पंचायत समितीच्या सदस्या सौ. जयश्री  आगवणे व दिगंबर आगवणे यांच्या मालकीच्या गट नं. 249, 250, 251, 252, मध्ये असलेल्या आयुर ट्रेडर्समधील या आगीत लाकूड फाटा 4,05,70,000/- (चार कोटी 5 लाख सत्तर हजार), पाचट 1, 70, 1264/-(एक कोटी सत्तर लाख एक हजार दोनशे चौसष्ट रुपये), बायोमास ब्रिकेट (पन्नास हजार रुपये) बग्यास 6,70,00000/-(सहा कोटी सत्तर लाख रुपये), ड्राय प्रेसमड 40,36,348/-(चाळीस लाख छत्तीस हजार तीनशे अठेचाळीस रुपये) व दोन ट्रक व इतर वाहने मिळून 18,50,000/-(अठरा लाख पन्नास हजार रुपये) असे एकूण 13,07,57,612/-(तेरा कोटी सात लाख सत्तावन हजार सहाशे बारा रुपये) एवढे प्रचंड नुकसान झाले आहे. फलटण- पुसेगाव रोडवर असणार्‍या या आयुर ट्रेडर्समधील आग जोरदार वाहणार्‍या वार्‍यामुळे विझविण्यात अपयश आल्यामुळे अग्निशमन पथकाला  पाचारण करण्यात आले. मात्र कंपनीमध्ये लावलेली सात वाहने, टायर्स तसेच लाकूड फाटा व बगॅसने पेट घेतल्याने सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवान यामध्ये कोणतीही जीवितहानी घडली नाही. फलटण नगरपालिका अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना पहाटे 3 च्या दरम्यान दूरध्वनीद्वारे ही माहिती मिळताच अग्निशामक दल त्या ठिकाणी दाखल होत चार ते पाच तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग मोठ्या प्रमाणावर वाढत गेल्याने कंपनीचा पूर्ण परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. घटनेनंतर कंपनीचे मालक दिगंबर आगवणे, युवा नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर, तहसीलदार विजय पाटील व महावितरणचे कार्यकारी अभियंता राजदीप यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील सूचना दिल्या. या नंतर महसूल मंडलाधिकारी, गावकामगार तलाठी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पंचनामा केला आहे. हवालदार रामदास लिमण, संजय राऊत ही आग कशामुळे व कशी लागली याचा तपास करत आहेत.
घटनास्थळी तालुक्यातील लोकांची एकच गर्दी
आतमध्ये लावलेल्या वाहनांचे टायर आगीमुळे फुटून मोठा आवाज झाल्याने ही घटना लक्षात आली. त्यानंतर ही आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. दुसर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी दोन पावले पुढे असणारे दिगंबर आगवणे यांच्या कंपनीला आग लागली असल्याची माहिती समजताच तालुक्यातील लोकांनी एकच गर्दी केली होती. अनेकांनी त्यांचे सांत्वन केले तर काही जण ही दुर्दैवी घटना पाहून अवाक झाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: