Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कृषी अधिकारी मारहाण प्रकरणी 5 जणांवर गुन्हे; एकास अटक, 4 फरार
ऐक्य समूह
Saturday, September 01, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: re3
5पाटण, दि. 31 : मल्हारपेठ येथील शेतकरी मेळाव्यात तालुका कृषी अधिकार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांच्यासह चार जणांवर पाटण पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेतले असून विक्रमबाबांसह इतर दोन संशयित फरार झाले आहेत. दरम्यान, आज तालुका कृषी विभागातील सर्व कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन करून झालेल्या घटनेचा निषेध केला.
याबाबत पाटण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, हुमनी कीड नियंत्रणासाठी एका खाजगी कंपनीच्या मदतीने तालुका कृषी विभागाने कदमवाडी (मल्हारपेठ) येथे शेतकरी मेळावा घेतला होता. मेळावा सुरू असताना विक्रमबाबा पाटणकर काही समर्थकांसह मेळाव्यात गेले व ओला दुष्काळाच्या निमित्ताने मेळावा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांनी याबाबत अटकाव केल्यानंतर विक्रमबाबांनी तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांना जाब विचारला. यावेळी शाब्दिक चकमक झाली व बाबांनी तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांच्या श्रीमुखात लगावून मारहाण आणि शिवीगाळ केली. या घटनेची रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे (रा. सर्वोदय कॉलनी, आगाशिवनगर, कराड) यांनी शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्याप्रकरणी विक्रमबाबा पाटणकर, घनश्याम मोरे, अनिल भोसले, संदीप शिवाजी पवार (सर्व रा. पाटण) व  प्रशांत पाटील (रा. मरळी) या पाच जणांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी संदीप शिवाजी पवार यास ताब्यात घेतले असून विक्रमबाबांसह अन्य तीन जण फरार झाले आहेत. त्यांचा शोध पाटण पोलीस घेत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: