Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नोटाबंदीनंतर 15 लाख कोटींच्या जुन्या नोटा परत
ऐक्य समूह
Thursday, August 30, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: na2
आरबीआयचा अहवाल;
भाजप-काँग्रेसमध्ये खडाजंगी
5नवी दिल्ली, दि. 29 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या तब्बल 99.30 टक्के म्हणजे 15 लाख कोटींच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा झाल्या आहेत. केवळ 13 हजार कोटी रुपयांच्या नोटा बँकेत आल्या नाहीत. बँकेचा 2017-18 चा वार्षिक अहवाल आज सादर झाला असून त्यातील आकडेवारीवरून नोटाबंदीचा निर्णय फसल्याची टीका काँग्रेससह विरोधी पक्षांनी केली आहे तर नोटाबंदीच्या निर्णयामागील सर्व हेतू साध्य झाल्याचा दावा भाजपने केला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा 2017-18 चा वार्षिक अहवाल बुधवारी प्रकाशित करण्यात आला. आरबीआयने यासंबंधी ट्विट करून सविस्तर अहवाल पाहण्यासाठी लिंक दिली आहे.  
या अहवालात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याचे म्हटले आहे. देशात गुंतवणूक आणि उत्पादनाचे प्रमाण वाढले असून महागाई काही प्रमाणात कमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अप्रत्यक्ष कर प्रणालीत जीएसटी मैलाचा दगड ठरल्याचे अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशाला आळा, दहशतवादाला मिळणार्‍या निधीत घट, नक्षलवाद कमी होईल,
हे सर्व उद्देश साध्य झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे; परंतु हा दावा फोल आहे. नोटाबंदीमुळे लाखो लोकांचा
रोजगार गेला. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांपुढे लागलेल्या
रांगांमध्ये शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. देशाच्या जीडीपीत दीड टक्का घसरण झाली, म्हणजेच काही लाख कोटींचे उत्पादन बुडाले. दहशतवाद कमी होण्याऐवजी वाढला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: