Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटण येथे एकाच कुटुंबातील पाच जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण
ऐक्य समूह
Wednesday, August 29, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: re4
5फलटण, दि. 28 : फलटण शहरातील अनेक भागात रुग्णांची संख्या वाढत असताना धनगरवाडा (बुधवार पेठ) येथील एकाच कुटुंबातील पाच लोकांना डेंग्यूसदृश आजार झाल्याचे निष्पन्न झाल्याने शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गतवर्षी डेंग्यूसदृश आजाराची साथ पसरल्याने आणि त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याने नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने पहावे अन्यथा आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो याची भीती सर्वसामान्यांच्या मनात कायम आहे. फलटण शहरातील बुधवार पेठ, धनगर वाडा भागातील एकाच कुटुंबातील विक्रम रामचंद्र भोसले (वय 40), सौ. रेश्मा विक्रम भोसले (वय 35), साक्षी विजय भोसले (वय 13), सिद्धांत विजय भोसले (वय 11), सृष्टी विक्रम भोसले (वय 8) या पाच जणांना डेंग्यूसदृश आजार झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांनी त्यांना डेंग्यूसदृश आजार झाल्याचे निदान केले आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे फलटण शहरात हा आजार धुमाकूळ घालणार का? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील उघडी गटारे, गटारातून जाणार्‍या पिण्याच्या पाण्याच्या पाइप लाइन, तुटलेल्या तोट्या, साठलेली डबकी, अनेक भागात पसरलेला कचरा, त्यातून फिरणारी मोकाट कुत्री, डुकरे, जनावरे पडत असलेला पाऊस यामुळे गटार व कचर्‍यातून निर्माण होणारी दुर्गंधी, वाढलेली डासांची संख्या या सर्वांमुळे फलटण शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: