Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणाचे सहा दरवाजे पुन्हा साडेपाच फुटांवर
ऐक्य समूह
Tuesday, August 28, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: re4
पाणीसाठा 104 टीएमसी; 31 हजार क्युसेक्स आवक
5पाटण, दि. 27 : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने धरणात 103.95 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शिवसागर जलाशयात 31 हजार 67 क्युसेक्स पाण्याची आवक होत असून  अतिरिक्त पाणी सहा वक्र दरवाजांमधून सोडले जात आहे. सोमवारी सर्व दरवाजे साडेपाच फुटांपर्यंत वाढवण्यात आले. पायथा वीजगृहातून 2,100 आणि धरणातून 48,617 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, कोयना नदीवरील मूळगाव पूल तिसर्‍यांदा पाण्याखाली गेल्याने सोमवारी पाटणच्या आठवडा बाजारासाठी आलेल्या नदीपलीकडील ग्रामस्थांचे हाल झाले. एक किलोमीटर अंतरासाठी त्यांना नवारस्तामार्गे 15 किलोमीटर अंतर जावे लागले.
पावसाने शनिवारी मध्यरात्रीपासून पुन्हा जोर धरल्याने रविवारी धरणाचे दरवाजे सकाळी तीन फुटांनी आणि सायंकाळी 4 फुटांनी उचलण्यात आले. मात्र, धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने सोमवारी सकाळी 9.30 वाजता धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर उचलण्यात आले. धरणाच्या पायथा वीजगृहातून आणि वक्र दरवाजांमधून मिळून 50,717 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू करण्यात आला. धरणात 31,067 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरणातून विसर्ग सुरू असल्याने नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे. 
त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मूळगाव पूल पाण्याखाली गेल्याने पाटणचे सपोनि यू. एस. भापकर यांनी तेथे पाहणी केली. पोलिसांनी बॅरिकेडस् लावून रस्ता बंद केला आहे. सोमवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत कोयनानगर येथे 25 (5110), नवजा 49 (5492) आणि महाबळेश्‍वर येथे 26 (4799) मिमी पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीपातळी 2162 फूट 06 इंच आणि 659.130 मीटर झाली आहे.
मूळगाव पूल तिसर्‍यांदा पाण्याखाली
कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने मूळगाव पूल तिसर्‍यांदा पाण्याखाली जाऊन चार गावांचा पाटणशी असलेला संपर्क तुटला आहे. सोमवारी सकाळी पुलावर पाणी नसल्याने पाटणच्या आठवडा बाजारासाठी ग्रामस्थ आले होते. दुपारी 3 वाजता पूल पाण्याखाली गेल्याने मूळगाव, चोपडी, त्रिपुडी, कवरवाडी येथील ग्रामस्थांची गैरसोय झाली. ग्रामस्थांना एक किलोमीटर अंतरासाठी नवारस्तामार्गे 15 किलोमीटर अंतर तोडून आपापल्या गावी जावे लागले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: