Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वसुंधरा राजेंच्या गौरव यात्रेवर दगडफेक
ऐक्य समूह
Monday, August 27, 2018 AT 10:54 AM (IST)
Tags: na2
5जोधपूर, दि. 26 (वृत्तसंस्था) : आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची गौरव यात्रा सुरू आहे. 58 दिवसांच्या या यात्रेमध्ये त्या राज्यभराचा दौरा करणार आहेत. दरम्यान, या यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याच्या दुसर्‍या दिवशी जोधपूरमध्ये वसुंधरा राजेंना विरोधाचा सामना करावा लागला. माध्यमांतील वृत्तानुसार, पिपाड येथे रात्री उशिरा त्यांच्या यात्रेवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये अनेक गाड्यांचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी अशोक गहलोत यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. मात्र, विरोधानंतरही वसुंधरा राजेंनी ठरल्याप्रमाणे सर्व सभांना संबोधित केले, पण रात्री मुक्कामाला खेजडला येथे न थांबता त्या जयपूरला रवाना झाल्या. रक्षाबंधन असल्यामुळे पुढील तीन दिवसांसाठी त्यांची यात्रा स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  ओसिया येथे वसुंधरा राजे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. देचू येथे त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. शेरगढमध्ये काही जणांनी त्यांचे पोस्टर फाडले. तर भोपालगड विधासभा क्षेत्रातील बावडी येथे सभेच्या आधी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे.
काँग्रेसच्या एका नेत्याच्या इशार्‍यावरुन हे घडवण्यात आले. ज्या लोकांनी राज्यासाठी काहीही केले नाही. सत्तेपासून दूर असल्यामुळे ते बावचळले आहेत म्हणून ते असे कृत्य करत आहेत. एका महिलेला घाबरवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पण आम्ही घाबरणार नाही, नारीशक्ती कोणालाही घाबरत नाही. राजस्थानसाठी माझा जीव गेला तरी मी माझे नशीब समजेल, अशी प्रतिक्रिया या संपूर्ण घटनेवर बोलताना वसुंधरा राजे यांनी दिली.
ओसिया येथे काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता, पण बळाचा वापर करुन त्यांना हटवण्यात आले. पिपाड येथे दगडफेकीची घटना समोर आली आहे, पण गाड्यांचे नुकसान झाले नाही, अशी माहिती येथील डीआयजी राघवेंद्र सुहासा यांनी दिली. 30 सप्टेंबरपर्यंत वसुंधरा राजेंची गौरव रथ यात्रा सुरू राहणार आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी चारभुजानाथ मंदिराच्या येथून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर यात्रेला सुरूवात झाली होती. या यात्रेचा पहिला टप्पा संपला असून आता दुसरा टप्पा सुरू आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: