Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हक्कासाठी आवाज उठवल्यास दलितांना मारहाण होते : राहुल
ऐक्य समूह
Monday, August 27, 2018 AT 10:56 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 26 (वृत्तसंस्था) : भारतात दलितांना काहीच मिळत नाही. हक्कासाठी आवाज उठवल्यास त्यांना मारहाण केली जाते. भारताला वेगळ्याच वाटेवर नेले जात आहे. हातात हात घालून चालण्याच्या भारताच्या शक्तीला तोडण्याचे काम केले जात आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर केली.
लंडन येथे ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’ला संबोधित करताना त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. क्रोध आणि द्वेषाचे उच्चाटन करण्याची काँग्रेसमध्ये ताकत आहे. काँग्रेस देशाला अखंड ठेवण्यावर भर देते. ’अनिवासी भारतीय’ हा अत्यंत अर्थगर्भ शब्द आहे. काँग्रेसची सुरुवातही अनिवासी भारतीयांनी केली होती. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल हे सुद्धा अनिवासी भारतीयच होते. त्यांनी आधी जग पाहिले, जगभर घडणार्‍या घडामोडी आणि चळवळी पाहिल्या आणि भारताला पुढे नेण्यासाठी योगदान दिले, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘मी सत्तेत येण्यापूर्वी देशात काहीच झाले नव्हते, असे मोदी म्हणतात. अशावेळी ते भारतीय जनतेची टर उडवतात. 
माझ्या आजोबा-आजींवर टीका करतात. भारत झोपलेला हत्ती होता, मी आल्यावर त्याला जागे केले, असे ते लालकिल्ल्यावरून म्हणाले. यावरून त्यांचा अहंकार दिसून येतो. भारत कोण्या एखाद्या व्यक्तीने नव्हे तर भारतातील जनतेने घडवला आहे, हे त्यांना कळायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला. गेल्या 70 वर्षांत देशाचा जो काही विकास झाला. त्यात काँग्रेसचा थोडा का होईना पण हातभार लागला आहे. जनतेने हिंमत दाखवली, मेहनत घेतली आणि देशाचा विकास झाला. पण भाजपने सत्तेत आल्यानंतर सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि आरबीआयला कमकुवत करण्याचे काम केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: