Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संपावर जाणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईचा इशारा
ऐक्य समूह
Tuesday, August 07, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: mn4
थकीत महागाई भत्ता देण्याचा शासन निर्णय जारी
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी): संपावर जाणार्‍या कर्मचार्‍यांवर अत्यावश्यक सेवा कायद्याखाली कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचार्‍यांना 14 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता देण्यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी संध्याकाळी जारी करण्यात आला. ही रक्कम ऑगस्ट 2018 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. बक्षी समितीच्या शिफारशींनुसार सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीस काही कारणास्तव विलंब झाल्यास जानेवारी 2019 पासून केंद्र शासनाच्या वेतन निश्‍चितीच्या सूत्रानुसार वेतन देण्यासही या शासन निर्णयानुसार तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचार्‍यांना चौदा महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम ऑगस्ट 2018 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचार्‍यांना अनुज्ञेय सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील (वेतन बँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) महागाई भत्त्याचा दर सुधारित करण्यात आला होता. हा दर 1 जानेवारी 2017 पासून 132 टक्क्यांवरून 136 टक्के करण्यात आला. 1 ऑगस्ट 2017 पासून या महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात आली आहे. 1 जुलै 2017 पासून महागाई भत्त्याचा दर 136 टक्क्यांवरून 139 टक्के करण्यात आला होता. 1 फेब्रुवारी 2018 पासून या महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात आली आहे.         
संपावर जाणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई
संपावर जाणार्‍या कर्मचार्‍यांवर अत्यावश्यक सेवा कायद्याखाली कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचार्‍यांच्या संघटनेने पुकारलेला संप बेकायदेशीर आहे. संपात सहभागी होणार्‍या कर्मचार्‍यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. ‘काम नाही तर वेतन नाही’ हे केंद्र शासनाचे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. शासनाच्या काही सेवा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमांतर्गत घोषित करण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवा, परिवहन, पाणी वितरण सेवा, शिक्षणाचा
हक्क कायद्यांतर्गत सेवा देणारे कर्मचारी अशांना याबाबत अवगत करण्यात येत आहे तरीही जे कर्मचारी संपावर जातील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: