Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तीन राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे
ऐक्य समूह
Thursday, March 22, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 21 (वृत्तसंस्था) : गेल्या तीन दिवसात तीन राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या महाअधिवेशनामध्ये पूर्वापार चालत आलेली पक्षातील संस्कृती मोडीत काढण्याचा नारा दिला होता. त्यानंतर तीन दिवसांमध्ये तीन राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसला धक्का दिला की काँग्रेसने त्यांना धक्का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली नव्या टीमच्या लाँचिंगसाठी मार्ग मोकळा केला जातोय का? 
 2012 च्या निवडणुकीच्या तुलनेत 2018 मध्ये झालेल्या गुजरात निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. पक्षाला चांगले यश मिळवून देण्यात प्रदेशाध्यक्षांचा सिंहाचा वाटा होता. तरीही सोमवारी भरतसिंह सोळंकी यांनी गुजरातच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काल गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनीही राजीनामा दिला. हे राजीनामा सत्र गुजरात, गोवा त्यानंतर उत्तरप्रदेशमध्येही गेले.  उत्तर प्रदेश राज्याच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राज बब्बर यांनी राजीनामा दिला आहे. उत्तरप्रदेश मधील नव्या चेहर्‍याला किंवा युवा काँग्रेस उमेदवाराला राज्याचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, काल रात्री उशीरा राज बब्बर यांनी राजीनामा दिला आहे. राज बब्बरकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.  तर उत्तरप्रदेश काँग्रेसने यावर प्रतिक्रिया देणं टाळले. राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस वर्किंग कमिटीची नवी रचनाही अपेक्षित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नव्या वर्किंग कमिटीत 25 टक्के जागा 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना दिल्या जाण्याची शक्यता आहे. वर्किंग कमिटीत 33 टक्के महिलांना स्थान मिळावे, असाही प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: