Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जम्मू-काश्मीरमध्ये आणखी तीन अतिरेक्यांचा खात्मा चकमकीत 2 जवान, 2 पोलीस शहीद
ऐक्य समूह
Thursday, March 22, 2018 AT 10:58 AM (IST)
Tags: na1
5श्रीनगर, दि. 21 (वृत्तसंस्था) : भारतीय सुरक्षा दलाने मंगळवारी कुपवाडा येथे चार अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यानंतर सलग दुसर्‍या दिवशी पुन्हा तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे. दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीदरम्यान 2 भारतीय जवान व 2 पोलीस शहीद झाले आहेत. कुपवाडामध्ये आणखी तीन अतिरेकी लपून बसल्याची शक्यता असल्याने लष्कराने सर्च ऑपरेशन सुरू ठेवले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कुपवाडा जिल्ह्यातील आरामपोरा येथे मंगळवारी सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 
त्यानंतरही लष्कराने सर्च ऑपरेशन सुरू ठेवत आज पहाटे तीन दहशतवाद्यांना ठार केले. कुपवाडामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी अतिरेक्यांविरोधात मोहीम उघडली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून आरामपोरा येथे सुरक्षा दलाचे काही जवान गस्तीवर होते. आज पहाटे गस्तीवर असलेल्या या जवानांना निशाणा करत अतिरेक्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. त्याला प्रत्युत्तरादाखल जवानांनी गोळीबार केला असता त्यात तीन अतिरेकी ठार झाले, असे लष्कराच्या एका अधिकार्‍याने सांगितले.हलमतपोरा येथील लष्कराच्या कारवाईत संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली. या व्यतिरिक्त लष्कराने इंटरनेट सेवाही खंडीत केल्या. लष्कराच्या 41 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एसओजी आणि सीआरपीएफच्या जवानांद्वारे दहशतवाद्यांविरोधात ही शोध मोहीम सुरू आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: